वांजळे व चाकणकर : विवाहानंतर दोन युवा नेत्या आता पिंपरीच्याही राजकारणात?

वांजळे व चाकणकर : विवाहानंतर दोन युवा नेत्या आता पिंपरीच्याही राजकारणात?

खडकवासला : विवाहापूर्वीच राजकीय कारकिर्द सुरू करणाऱ्या महिलांचे प्रमाण कमीच असते. पुण्यातील दोन तरुणी विवाहापूर्वीच नगरसेविका झाल्या. आता विवाहानंतर सासरी जाऊन तेथे नव्याने कारकिर्द सुरू करायची की माहेरच्या मतदारसंघातच लक्ष घालायचे असा प्रश्न युवतींसाठी महत्त्वाचा ठरतो. पुण्यातील दोन युवा नेत्या लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्यानिमित्ताने खडकवासला विधानसभा मतदारसंघात तशी चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यातील मनसेच्या माजी नगरसेविका व मनसेच्या महिलाध्यक्षा युगंधरा कुंडल चाकणकर यांचा विवाह आज 13 डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथील पुनावळे गावातील शेतकरी कुटुंबातील शरद संपत दर्शील यांच्याशी होत आहे. तर,`सोनेरी आमदार` म्हणून प्रसिद्ध पावलेले कै. रमेश वांजळे यांची ज्येष्ठ कन्या पुणे महापालिकेची सर्वात लहान नगरसेविका सायली रमेश वांजळे हिचा साखरपुडा उद्या म्हणजे शुक्रवारी, 14 डिसेंबर भोसरी परिसरातील उद्योगपती आदित्य नथू शिंदे यांच्याशी होत आहे.

खडकवासला परिसरातील दोन युवा नेत्यांना पिंपरीत सासर मिळणार असल्याचे त्यांची राजकीय कारकिर्द खडकवासल्यात बहरणार की पिंपरीत याची आता पुढे उत्सुकता राहणार आहे.

युगंधरा यांचे वडील रयत शिक्षण संस्थेचे कर्मचारी होते. तर त्यांची आई प्रतिभा यांनी 2002 ची पुणे महापालिकेची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. त्यानंतर युगंधरा या 2012 मध्ये मनसेच्या नगरसेविका म्हणून पुणे महापालिकेत निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये देखील त्यांनी मनसेतून निवडणूक लढविली होती. मात्र त्यात पराभव झाला. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी तीन महिन्यांपूर्वी त्यांची पक्षाच्या खडकवासला मतदारसंघाच्या महिलाध्यक्ष म्हणून निवड केली होती. त्यांचे शिक्षण बीए, डी.एड आले आहे. त्यांचे पती शरद यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले असून त्यांची पुनावळे गावात 
शेतजमीन आहे.

सायली रमेश वांजळे या 2014 मध्ये वारजे प्रभागातून निवडून आल्या. पालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या मागीलवर्षी सदस्या होत्या.  यंदा त्या शहर सुधारणा समितीच्या सदस्य आहेत. त्यांचे वडील कै. रमेश वांजळे यांनी सरपंच, काँग्रेसचे हवेली पंचायत समिती सदस्य, उपसभापती व मनसेकडून आमदार अशी पदे भूषविली होती. त्यांची आई हर्षदा या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या होत्या. रमेश वांजळे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची पोटनिवडणूक लढविली होती.

सायलीचे चुलते शुक्राचार्य वांजळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष होते. दुसरे चुलते राजू हे आहिरेगावचे सरपंच होते. आता चुलतभाऊ युवराज हे सरपंच असून सायलीची बहिणदेखील ग्रामपंचायत सदस्य आहे.

सायलीचे भावी पती आदित्य हे हॉटेल व बांधकाम व्यावसायिक आहेत. आमदार महेश लांडगे यांचे ते चुलत भाचे आहेत. आदित्य यांचे वडील नथू शिंदे यांनी 2002 मध्ये भोसरीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. युगंधरा व सायली या दोघींच्या सासरच्या मंडळींनी त्यांना पुढे राजकारणात सक्रिय राहण्यास पाठींबा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com