यवतमाळ विधान परिषदेसाठी महाआघाडीकडून मतदारांना `दोन मिठाईचे बॉक्‍स`

...
yawatmal election mlc
yawatmal election mlc

यवतमाळ : महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षाच्या वतीने आज, सोमवार (ता. 20) येथील बलवंत मंगल कार्यालयात दुपारी बाराला मतदारांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात तिन्ही पक्षांच्या नेत्यांची खास करून उपस्थिती होती. त्यांनी मतदारांना विकासकामे करण्यासाठी भरभरून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.

विधान परिषद पोटनिवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडीतही सर्वकाही ऑलबेल नसल्याचे दिसून येत आहे. मतदार फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच सोमवारी जिल्ह्यातील मतदारांना एकत्रित करून त्यांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता "निष्ठे'ने महाआघाडीच्या उमेदवारास मतदान करण्याची शपथ देण्यात आली. निवडणुकीत असा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याने मतदारांसह उपस्थित नेतेही अवाक झाले.

या बैठकीत नेत्यांनी मतदारांना आघाडीचा धर्म पाळण्याची विनंती केली. या मेळाव्याला पालकमंत्री व शिवसेनेचे नेते संजय राठोड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक, कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, डॉ. वझाहत मिर्झा, राकॉंचे आमदार इंद्रनील नाईक, महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी, माजी आमदार वामनराव कासावार, विजय खडसे, प्रवीण देशमुख, नानाभाऊ गाडबैले, वसंतराव घुईखेडकर आदी नेते उपस्थित होते. विधान परिषद पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय उलटफेर झाला आहे. असे असले तरी सरळ लढत ही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच आहे.

निवडणुकीला स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशी किनार लाभली आहे. असे असले तरी ही निवडणूक भावनिक मुद्यांपेक्षा "मिठाई वाटपा'वर जास्त अवलंबून आहे. महाविकास आघाडीत अंतर्गत कुरबुरीमुळे सर्वकाही ऑलबेल नसल्याची स्थिती आहे. यामुळेच दोन दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. चर्चांना पूर्णविराम देण्यासोबतच आम्ही एक आहोत, हे दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने स्थानिक बळवंत मंगल कार्यालयात मेळावा घेतला. यात नेत्यांपासून  पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते. मतदारांना "निष्ठे'चा ठोस देवून पक्षादेश पाळण्याचे आवाहन नेत्यांनी केले. नेत्यांनीही टाळ्यांची दाद दिली. मात्र, आधी मिठाईचे "टोकण'नंतर आश्‍वासन असे धोरण अनेक मतदारांनी घेतले होते.

यामुळे मेळावा झाल्यानंतर मतदारांना वेगवेगळ्या दिशांनी रवाना करण्यात आले. काहींना आर्णी मार्गावर, काहींना दारव्हा नाका परिसरात तर काहींना वीर वामनराव चौकाचे मार्ग दाखविण्यात आले. या भागात "दोन मिठाईचे बॉक्‍स'मिळाल्याची चर्चा आहे. यानंतर मतदारांनी सोबत आहोत, असे आश्‍वासन दिल्याची चर्चा आहे. विजयापूर्वीच "मिठाई'चे वाटप सुरू झाल्याने मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com