Two new corona patients in Jamkhed | Sarkarnama

जामखेडमध्ये कोरोनाची साखळी तुटेना, नव्याने दोघेजण पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 एप्रिल 2020

जामखेडमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीची दोन मुले कोरोनाबाधित झाली. आता त्यांच्याच संपर्कात आलेल्या इतर दोन युवकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

नगर : जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना जामखेडमध्ये मात्र कोरोनाची साखळी तुटेना. आता नव्याने दोन रुग्णांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 34 वर आली आहे.

जिल्ह्यातील 34 पैकी 20 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना घरी सोडून होम क्वारंटाईन करण्यात आले. नगरच्या बूथ हाॅस्पिटलमध्ये 11 जणांवर उपाचार सुरू आहे. कोपरगाव, श्रीरामपूर व जामखेड येथील दिघांचा मृृत्यू झालेला आहे. नगर शहरातील हाॅट स्पाॅट असलेल्या मुकुंदनगर परिसरातील कोरोनाची साखळी तुटल्याची स्थिती निर्माण झाली असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यात जामखेड, संगमनेर, नेवासे येथील काही भाग तसेच नगर शहरातील मुकुंदनगर हा भाग हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर केला आहे. तेथे नागरिकांना घराबाहेर पडू दिले जात नाही. सर्व अत्यावश्यक सेवा प्रशासन पुरवित आहे. जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात मात्र काही अंशी नागरिकांना सूट देण्यात येत असून, नागरिक रस्त्यावर दिसू लागले आहे. प्रत्येक भागातील गरिब कुटुंबियांना संंबधित परिसरातील सेवाभावी संस्थांकडून अन्न पुरविले जात आहे. त्यांची भूक भागविण्यासाठीही शासनाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून नवीन रुग्ण न सापडल्याने आता जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा होती. तथापि, काल दोन रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने जामखेडमध्ये पुन्हा नागरिकांना घरातच बसून रहावे लागणार आहे.

त्या रुग्णाचेच नातेवाईक
दरम्यान, जामखेडमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीची दोन मुले कोरोनाबाधित झाली आहेत. आता त्यांच्याच संपर्कात आलेल्या इतर दोन युवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स हे काटेकोरपणे पाळले पाहिजे, हे वारंवार दिसून येत आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वतःहून चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. कोरोनाचे काहीच लक्षणे दिसत नसल्याने काही व्यक्ती डाॅक्टरांकडे जात नाहीत. त्यातून असे छुपे रुग्ण सापडत असल्याचे दिसून येत आहे.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख