परममित्र सत्तेसाठी झाले वैरी ! 

आजपर्यंत टोकाचे मतभेद होऊन युती तुटली नव्हती. युतीला ग्रहण लागले ते 2014 मध्ये. मोदी लाटेनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली आणि युती तुटली. त्यानंतरही रुसवेफुगवे निघाले. शिवसेना पुन्हा सत्तेत गेली. यावेळी (2019) सत्ता स्थापन करण्याचा जनादेश जनतेने देऊनही शिवसेना भाजपबरोबर गेली नाही. शिवसेना मैत्री तोडणार नाही. तुटेपर्यंत ताणणार नाही असे बोलले जात होते पण, तसे झाले नाही. गेल्या पंचवीस वर्षांपासूनचे परममित्र सत्तेसाठी वैरी झाले हे चित्र महाराष्ट्राने पाहिले.
परममित्र सत्तेसाठी झाले वैरी ! 

गेल्या पंचवीस वर्षापूर्वी देशात आणि महाराष्ट्रात कॉंग्रेस किती बलवान होती हे आज कोणी सांगितले तर कदाचित पटणार नाही. बलाढ्य अशा कॉंग्रेसच्या विरोधात लढणे तसे सोपेही नव्हते. मात्र शिवसेना-भाजप हे परममित्र हातात हात घालून लढले. कॉंग्रेस पुढाऱ्यांविरोधात लढण्याची खरी ताकद महाराष्ट्रात जर कोणत्या नेत्याने दिली असेल तर ते होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. 

बाळासाहेबांनी विधानसभेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहिले. या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी गावोगावचा शिवसैनिक पेटून उठला होता. बाळासाहेबांच्या मदतीला भाजपचे नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि फौजही आली. 1990 ते 1995 या काळात युतीने महाराष्ट्र पिंजून काढला.

राज्यात युतीचे सरकारही आले. गेल्या पंचवीस वर्षापासून ही युती प्रत्येक निवडणुकीत मतभेद असूनही एकत्रितपणे सामोरे गेली. आजपर्यंत टोकाचे मतभेद होऊन युती तुटली नव्हती. युतीला ग्रहण लागले ते 2014 मध्ये. मोदी लाटेनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली आणि युती तुटली.

त्यानंतर रुसवेफुगवे निघाले. शिवसेना पुन्हा सत्तेत गेली. यावेळी सत्ता स्थापन करण्याचा जनादेश जनतेने देऊनही शिवसेना भाजपबरोबर गेली नाही. यावेळीही शिवसेना खूप ताणणार नाही असे बोलले जात होते पण, तसे झाले नाही. शिवसेनेमुळे भाजप सरकार सत्ता स्थापन करू शकली नाही हा संदेश राज्यातील जनतेला गेला. 

शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती होती. मित्र खूप भांडले. मात्र एकमेकांपासून कधी दूर गेले नव्हते. आज महाराष्ट्राने दोन आदर्श मित्राची दोस्ती तुटताना पाहिले. याचे दु:ख नकीच असेल. खरेतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असणे लोकांना आवडत होते.

तसेच शिवसेना-भाजपबाबतही वाटत होते. राजकारणात काहीही घडू शकते हे आज स्पष्ट झाले. खरे मैत्री खूप गठ्ठ असली तरी काही वेळा किरकोळ कारणासाठी मैत्री तुटते तसेच आज झाले. भाजपचे देशात जे मित्र पक्ष आहेत त्यापैकी शिवसेना नक्कीच वेगळी होती. 

बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांनीही अखेरपर्यंत मैत्री कशी टिकेल हेच पाहिले. आज बाळासाहेब, वाजपेयी नाहीत मात्र अडवानी आहेत. त्यांना युती तुटली असे कळेल तेव्हा काय वाटेल. भाजप आम्हाला गोड बोलून संपवित आहे असा समज शिवसेनेने करून घेतला. मात्र जी शिवसेना कॉंग्रेसविरोधात मैदानात डरकाळी फोडत प्राणपणाने लढली तीच शिवसेना कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या गळाला लागली का ? हा प्रश्‍न आहे. 

शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. भाजपला पाठिंबा नाही म्हणजे नाही असे सांगत आली. शिवसेना पाठिंबा देत नाही हे लक्षात येतात भाजपने शिवसेनेला शुभेछ्छा दिल्या आहेत. शिवसेनेनेही भविष्याचा विचार केला असावा. उद्या जरी दोन्ही कॉंग्रेसशी पटले नाही तरी तिला स्वबळावर लढावे लागेल. ती कशी ताकद निर्माण करते हे पाहावे लागेल. भाजपने शिवसेनेचे दोर कापले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com