Two Found in Nagar with Home Quarantine Stamp | Sarkarnama

'होम क्वारंटाईन' केलेले दोघे हैदराबाद ते राहुरी दुचाकीवर; गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरी जायचे कसे, हा प्रश्‍न हैदराबादमधील कंपनीत काम करणाऱ्या दोघांना पडला. त्यातला एक जण संगमनेर तालुक्‍यातील तळेगाव दिघे येथील आणि एक गुजरातमधील अहमदाबादचा. दोघे मोटरसायकलवर निघाले. ते आज राहुरीत सापडले

राहुरी  : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरी जायचे कसे, हा प्रश्‍न हैदराबादमधील कंपनीत काम करणाऱ्या दोघांना पडला. त्यातला एक जण संगमनेर तालुक्‍यातील तळेगाव दिघे येथील आणि एक गुजरातमधील अहमदाबादचा. दोघे मोटरसायकलवर निघाले. एके ठिकाणी आरोग्य यंत्रणेने पकडून त्यांच्या हातावर 'होम क्वारंटाइन'चा शिक्का मारला; पण त्या शिक्‍क्‍यांसह दोघे पुढे जात राहिले. राहुरी फॅक्‍टरीपर्यंत पोचले. तिथे मात्र पोलिसांनी पकडले. गुन्हा दाखल करून दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

अनुक्रमे 25 आणि 23 वर्षांचे असलेले हे दोन्ही तरुण हैदराबाद येथे एका कंपनीत नोकरीस आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना सुटी दिली. दोघांना घरी परतण्याचे वेध लागले. एकाला तळेगावला आणि दुसऱ्याला अहमदाबादला जायचे होते. मात्र, तेवढ्यात केंद्र सरकारने देशभरात संचारबंदी लागू केली. त्यामुळे हे दोघे दुचाकीवरून घरी निघाले. महाराष्ट्राच्या सीमेवर त्यांना पोलिसांनी अडविले. वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या हातावर 'होम क्वारंटाईन' शिक्का मारला. 'आता बाहेर फिरू नका,' असा सल्ला दिला. मात्र, दोघेही 'होम क्वारंटाईन' शिक्के घेऊन दुचाकीवरून प्रवास करीत नगर जिल्ह्यात आले.

हातावर शिक्का दिसला अन पकडले

आज (गुरुवारी) सकाळी राहुरी फॅक्‍टरी येथे पोचले. नगर-मनमाड महामार्गावर श्रीरामपूर-ताहाराबाद रस्त्याच्या चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे दोघे गडबडले. चौकाजवळच भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीत जाऊन उभे राहिले. त्याच वेळी या शेतकऱ्यांना उठविण्यासाठी व गर्दी हटविण्यासाठी पोलिस तेथे पोचले. त्यात त्यांना हातावर 'होम क्वारंटाईन' शिक्के असलेले दोन्ही तरुण दिसले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून, नगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख