भाजपच्या दोन सरपंचांच शुभमंगल सावधान....पण अक्षता पडण्याआधी स्वच्छता अभियान! - two bjp sarpanchs did cleanness movement in village on marriage day | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या दोन सरपंचांच शुभमंगल सावधान....पण अक्षता पडण्याआधी स्वच्छता अभियान!

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 13 जानेवारी 2019

कोण म्हणतं, भाजपच्या मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वच्छता संदेश मनावर घेतला नाही ते, असा प्रश्न यापुढे कोणी विचारला तर त्यावर भाजपला सोरतापवाडीचे उदाहरण देता येईल.

पुणे : लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीची वेगळीच लगबग असते. पै-पाहुणेही नवरा-नवरीला कोणतेच काम सांगत नाहीत. मात्र सोरतापवाडीचे सरपंच आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी मात्र लग्नाच्या दिवशीही आपले नेहमीच काम टाळले नाही. त्यांनी गावातील साप्ताहिक स्वच्छता मोहीम आज सलग 83 व्या आठवड्यात राबवली. आज (13 जानेवारी) संध्याकाळी लग्नाची सनई वाजण्याआधी गावातील कचरा सकाळी साफ केला. 

त्यांच्या भावी पत्नी प्रियांका मेदनकर यादेखील भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव आणि खेड तालुक्यातील मेदनकरवाडी गावच्या सरपंच आहेत. दोघेही भाजपचे सरपंच, दोघेही भाजयुमोचे पदाधिकारी यामुळे पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत या विवाहाची चर्चा आहे. दोघेही सरपंच म्हणून 2020 पर्यंत पदावर राहणार आहेत.

चौधरी हे आपल्या गावात गेली 82 आठवडे स्वच्छता मोहीम राबवत आहे. आज त्यांचे लग्न असल्याने ते यास सुट्टी देतील, अशी चर्चा होती. मात्र त्यांनी नेहमीच्या रविवारप्रमाणे गावातील तरुणांना एकत्र करून गाव स्वच्छ केले. सीएम चषक, गणेश फेस्टिवल आदी विविध बाबींत ते अग्रेसर असतात.      

प्रियांका यांनीही मेदनकरवाडी येथे महिला आणि आरोग्य संदर्भात असेल किंवा एक रुपयात सॅनिटरी नॅपकिन वाटप, सरपंच आपल्या दारी हा उपक्रम, डिजिटल ग्रामपंचायत असे विविध उपक्रम राबविले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख