जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; शिवसेनेच्या 10 रणरागिणींमधून होणार निवड

पालघर जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. 18 जागांवर विजय मिळवत शिवसेना मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल 14 जागा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी होणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून जाहीर करण्यात आले आहे
Tussle in Shivsena over Palghar Zilla Parishad President Post
Tussle in Shivsena over Palghar Zilla Parishad President Post

मोखाडा : पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक 18 जागा घेऊन शिवसेना मोठा पक्ष ठरला आहे. येथेही राज्यात उदयास आलेल्या महाविकास आघाडीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. शिवसेनेच्या 10 रणरागिणी अनुसूचित जमाती गटातून निवडून आल्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. यामधून कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पालघर जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. 18 जागांवर विजय मिळवत शिवसेना मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल 14 जागा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी होणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून जाहीर करण्यात आले आहे, तर शिवसेनेचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उपाध्यक्ष पालघर जिल्हा परिषदेत बसणार असल्याचे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत ठरल्याचेही स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेच्या 18 जागांमध्ये 12 रणरागिणी निवडून आल्या आहेत. त्यामध्ये 10 अनुसूचित जमाती गटातून निवडून आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्षपदासाठी पालघरमधील दांडी गटातून निवडून आलेल्या वैदेही वाढाण, जव्हारच्या कासटवाडी गटातील गुलाब राऊत, डहाणूतील गंजाड गटातून अमिता घोडा आणि विक्रमगडच्या तलवाडा गटातून निवडून आलेल्या भारती कामडी यांच्या नावाची चर्चा आहे.

वैदेही वाढाण या 2012 मध्ये ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेनेकडून निवडून गेल्या होत्या. त्या एम. ए. बीएड. असून त्यांनी 5 वर्षे शिक्षिका म्हणून काम केले आहे. पालघर आणि डहाणू विधानसभेच्या शिवसेना महिला आघाडीच्या संघटक म्हणूनही त्यांनी काम केले आहे, तर नामांकित वृतपत्रांच्या पत्रकार म्हणून त्या कार्यरत आहेत. गुलाब राऊत या दुसऱ्यांदा जव्हारमधील कासटवाडी गटातून शिवसेनेकडून निवडून आल्या आहेत. त्यांनी कासटवाडी ग्रामपंचायतीचे 10 वर्षे सरपंचपद भूषविलेले आहे; तर मागील पंचवार्षिकमध्ये पालघर जिल्हा परिषदेत महिला, बालकल्याण आणि समाजकल्याण समितीच्या सदस्या म्हणून त्यांनी काम केले आहे.

विक्रमगडमधील तलवाडा गटातून भारती कामडी यादेखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. त्या दुसऱ्यांदा पालघर जिल्हा परिषदेत निवडून आल्या आहेत. दरम्यान, 15 फेब्रुवारीपर्यंत मावळत्या जिल्हा परिषदेचा कार्यकाळ असून त्याआधीच पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शर्यतीत असलेल्या शिवसेनेच्या या चार उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

अमिता घोडा यांचे नाव आघाडीवर

अमिता घोडा या माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी; तसेच दिवंगत माजी आमदार कृष्णा घोडा यांच्या स्नुषा आहेत. त्यांनी 10 वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. पालघर विधानसभेच्या निवडणुकीत अमित घोडा यांनी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार निवडून आणण्यासाठी अमेदवारी अर्ज माघारी घेतला होता. त्यावेळी घडलेल्या राजकीय घडामोडीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अमित घोडा यांना शिवसेना अमितला सांभाळणार असल्याचे जाहीर भाषणात सांगितले होते. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ अमिता यांच्या गळ्यात पडण्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com