Tussle for minister"s office posting among officers and O.S.D. | Sarkarnama

भावी मंत्र्यांकडे पी . ए . पदासाठी उतावीळ अधिकाऱ्यांनी लावली फिल्डिंग 

संजीव भागवत : सरकारनामा न्यूज ब्युरो
सोमवार, 8 मे 2017

काही मंडळी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलून  कोणाचे मंत्री पद  जाणार आणि कोणाला मंत्री होण्याची संधी मिळणार याचा अभ्यास शात्रशुध्ध पद्धतीने आणि बारकाईने करीत आहेत . एव्हढेच नव्हे तर संभाव्य मंत्र्यांच्या थेट किंवा आप्तेष्ठांमार्फत गुपचूप भेटी घेत आहेत .

मुंबई : जहाज बुडू लागले की उंदीर आधी उडी मारून स्वतःचे प्राण वाचवतात अशी म्हण  आहे . या म्हणीनुसार मंत्रिमंडळ फेरबदलात  आपल्या मंत्री महोदयांचे आसनस्थिर  आहे की डळमळीत याची माहिती काढून अस्थिर मंत्र्यांच्या सेवेतील काही जण संभाव्य मंत्र्यांकडे फिल्डिंग लावू लागले आहेत . 

:राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचा धसका शिवसेना-भाजपाच्या मंत्र्यांकडे असलेल्या ओसएसडी, पीएस आणि पीएंनीही घेतला आहे. संभाव्य मंत्री कोण होतील याची बरीच मोठी कुजबूज सुरू असल्याने त्या-त्या आमदारांकडे मंत्री होण्यापूर्वीच आपला वशिला लावण्यासाठी या मंडळींनी शोध मोहीम जोरात सुरू केल्याच्या चर्चा मंत्रालयात सुरू आहेत.

मागील अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू असलेल्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार या महिन्यात होणार असल्याचे निश्चित झाले आहे .  मंत्रयांच्या नावात  शिवसेनेत विधान परिषद सदस्यातून  मंत्री झालेल्याना दूर करून  विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांना संधी मिळावी म्हणून एक गट प्रयत्न  करीत आहे . 

या गटातर्फे  उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत सध्या डेंजर झोन मध्ये असल्याचा प्रचार केला जातोय .

 पण यापैकी अनेकांना मंत्री करायचेच असे उद्धव ठाकरे यांनी आधी ठरवून त्यांना विधान परिषदेवर पाठवलेले आहे . पण शिवसेनेच्या गोटात नव्या चेहऱ्यानं संधी देण्याच्या हालचाली सुरु अहित हे नक्की .

भाजपाच्या गोटातून सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, आदिवासी विकास व वन राज्यमंत्री राजे अंब्रीशराव अत्राम, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर  आदींची नावे डेंजर झोनमध्ये असल्याचे सांगितले जाते . 

त्यामुळे डेंजर झोनमधील मंत्र्यांकडे ओएसडी ( ऑफिसर व स्पेशल ड्युटी ) , खासगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक  आदींनी साहेबांचे पद  जायचेच असेल तर जाऊ देत पण माझे पद  कायम राहो असे म्हणत अनेक नामवंत देवांना साकडे घातले आहे , नवस देखील  बोलले आहेत  . 

मात्र सर्वच जण देवावर भरवसा ठेवून निवांत बसणारे नाहीत . काही मंडळी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलून  कोणाचे मंत्री पद  जाणार आणि कोणाला मंत्री होण्याची संधी मिळणार याचा अभ्यास शात्रशुध्ध पद्धतीने आणि बारकाईने करीत आहेत .

 एव्हढेच नव्हे तर संभाव्य मंत्र्यांच्या थेट किंवा आप्तेष्ठांमार्फत गुपचूप भेटी घेत आहेत .  ओएसडी आणि पीएस पदासाठी स्पर्धक असणारे अधिकारी आपल्या प्रतिस्पर्ध्याला बेसावध ठेवून आपले स्थान नव्या ठिकाणी बळकट करू पाहत आहेत ,

यात ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या एका आमदाराला संभाव्य मंत्र्याच्या यादीत नाव येण्याची शक्यता असल्याने अनेकांनी या आमदाराला बदलापूर येथे जाऊन आपल्या कामाची आणि कार्याची माहिती दिली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.

  विधानसभेत शिवसेनेच्या संभाव्य आमदारांकडेही अशीच सध्या रीघ लागली आहे .   आपण कोणती कामे करू शकतो याचे एका नवख्याने  पीपीटी तयार केले आहे अशी चर्चा आहे .  काही कॅबिनेट मंत्र्यांकडे असलेलेही हे अधिकारी नव्या ठिकाणी " चांगली" संधी मिळते काय, या शोधात असल्याचे मंत्रालयातील अनेक दालनात सांगितले जात आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख