Tussle in Kalyan Dombivali Trasport Committee Election | Sarkarnama

कल्याण डोंबिवली परिवहन समिती सभापती निवडणुकीत भाजपाचे पारडे जड 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन ( केडीएमटी ) समिती मध्ये शिवसेना भाजपाची युती असून सत्ता समीकरणानुसार प्रत्येक एक वर्षाने शिवसेना आणि भाजपाच्या परिवहन समिती सदस्याला सभापती पद मिळत होते. सध्या शिवसेनेचे सदस्य मनोज चौधरी हे सभापती असून त्यांचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात संपत आहे

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक नंतर आता सर्वाना पालिका परिवहन ( केडीएमटी ) समिती सभापती पदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहे .समिती मधील पक्षीय बलाबल पाहता भाजपाचे पारडे जड असल्याने शिवसेना कुठली राजकीय खेळी खेळते याकडे लक्ष्य लागले आहे .

कल्याण डोंबिवली महानगर पालिका मध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता होती. सत्तेचे समीकरण करताना काही पदे वाटप करण्यात आली होती. मात्र, राज्यातील सत्ता परिवर्तन नंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिका स्थायी समिती सभापती निवडणुकी मध्ये पालिकेत युतीची सत्ता असताना, स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपाची टर्म असताना शिवसेनेने आपला उमेदवार उभा करून निवडणुकीत चुरस आणली होती. या निवडणुकीत शिवसेना भाजपा युती तुटल्याची चर्चा होती. मात्र अधिकृत बोलण्यास शिवसेना भाजपा नेते नकार देत आहेत.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन ( केडीएमटी ) समिती मध्ये शिवसेना भाजपाची युती असून सत्ता समीकरणानुसार प्रत्येक एक वर्षाने शिवसेना आणि भाजपाच्या परिवहन समिती सदस्याला सभापती पद मिळत होते. सध्या शिवसेनेचे सदस्य मनोज चौधरी हे सभापती असून त्यांचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात संपत असून फेब्रुवारी अखेर आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक असल्याने आता राजकारण तापू लागले आहे. 

परिवहन समिती मध्ये शिवसेना 6 आणि भाजपा 6 सदस्य असून स्थायी समिती सभापती हे परिवहन समिती मध्ये पद सिद्ध सदस्य आहेत. आता सध्या भाजपा नगरसेवक विकास म्हात्रे हे स्थायी समिती सभापती असल्याने परिवहन समिती मध्ये भाजपाची संख्या 7 झाल्याने भाजपाचे पारडे जड झाले आहे. स्थायी समिती सभापती निवडणूक प्रमाणे शिवसेना भाजपा सोबत युती तोडत आपला परिवहन समिती सभापती निवडणूकी मध्ये उमेदवार देणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले असून हळूहळू राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख