Tussle between Sambhaji Nilangekar and Amit Deshmukh | Sarkarnama

लातूर लोकसभा मतदारसंघ : अमित देशमुख, निलंगेकरांची कसोटी

हरी तुगावकर
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कॉंग्रेसच्या या बालेकिल्ल्यात सध्या भाजपचे वर्चस्व आहे. मतदारसंघात भाजप किंवा कॉंग्रेसचा उमेदवार अद्याप निश्‍चित नाही. उमेदवारी निवडीपासून ते त्यांना विजयी करेपर्यंत भाजपचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांचा कस लागणार आहे.

लातूर : कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमधून माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर सलग सात वेळा विजयी झाले. भाजपला दोनदाच मतदारसंघ ताब्यात घेता आला. भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी श्री. चाकूरकरांचा वर्ष 2004 मध्ये पराभव केला होता. 2009 च्या निवडणुकीत मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोल्हापूरचे जयवंत आवळे यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. वर्ष 2014 मध्ये 'मोदी लाटे'वर भाजपचे डॉ. सुनील गायकवाड स्वार होत अडीच लाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. बालेकिल्ला असूनही कॉंग्रेसला एकदाही मताधिक्‍य मिळाले नाही. त्यामुळे डॉ. गायकवाडांचा विजय कॉंग्रेसच्या जिव्हारी लागला होता.

जिल्ह्यात काही वर्षांत पालकमंत्री निलंगेकर यांचे नेतृत्व पुढे आले. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांनी कॉंग्रेसचा "हात' कापत "कमळ' फुलविले. लातूरकरांची मागणी नसताना त्यांनी दिलेला रेल्वे बोगी कारखाना व जिल्हाभरात पसरत असलेले राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, या मुद्द्यांवरून भाजप रिंगणात उतरेल. राज्याच्या योजना भाजपच्या जमेच्या बाजू असल्या, तरी तीन ते चार वर्षांत डॉ. गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातीलच काही गट नाराज आहेत. डॉ. गायकवाडांना विरोध म्हणून काही गटांतून उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव व जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांची नावे पुढे आणली जात आहेत.

पण गेल्या निवडणुकीसारखेच डॉ. गायकवाड पक्षश्रेष्ठींकडे वजन खर्च करून पुन्हा उमेदवारी आणतील, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. भाजपकडून उजनीचे पाणी लातूरला देण्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही. लातूरकरांच्या अस्मितेची असलेली लातूर-मुंबई रेल्वे बिदरला जाऊ दिली. ती लातूरपर्यंतच पुन्हा ठेवण्यातही त्यांना यश आलेले नाही. याशिवाय जिल्ह्यातील बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्‍नही कॉंग्रेसकडून ऐरणीवर आणले जाण्याची शक्‍यता आहे.

दुसरीकडे कॉंग्रेसला तगडा उमेदवार सापडत नाही. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था हातून गेल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख आगामी निवडणुकीसाठी सावध पावले उचलत आहेत. सध्या कॉंग्रेसकडून माजी सनदी अधिकारी भा. ई. नगराळे, डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, उदगीरच्या माजी नगराध्यक्ष उषा कांबळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

भाजप आणि कॉंग्रेससमोर उमेदवार निवडीचा प्रश्न असला तरी कस मात्र पालकमंत्री निलंगेकर व आमदार अमित देशमुख यांचा लागणार आहे. दरम्यान, अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली. माजी शिक्षणाधिकारी राम गारकर यांना त्यांनी रिंगणात आणले आहे.

2014 चे मतविभाजन
डॉ. सुनील गायकवाड (भाजप) : 6,16,650 (विजयी)
दत्तात्रय बनसोडे (कॉंग्रेस) : 3,63,114

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख