Tussle between NCP and BJP over credit | Sarkarnama

राष्ट्रवादी- भाजपत विकासकामांवरून श्रेयाची लढाई 

उत्तम कुटे : सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 8 एप्रिल 2017

पालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपची कोंडी करीत त्यांना घेरण्याचे काम विरोधी बाकावरील राष्ट्रवादीने पहिल्या दिवसापासून सुरू केले आहे. 

पिंपरी : भाजप व राष्ट्रवादीमध्ये विकासकामांच्या उद्‌घाटनावरून आता श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत त्यात आणखी रंग भरण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपची कोंडी करीत त्यांना घेरण्याचे काम विरोधी बाकावरील राष्ट्रवादीने पहिल्या दिवसापासून सुरू केले आहे. 

राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी आपल्या पाठपुराव्यामुळे उठली असल्याचा दावा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. तर, त्याचे श्रेय हे त्यासाठी लढा देणाऱ्या बैलगाडामालक आणि त्याच्या शौकिनांचे आहे, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी दिले आहे. ही शहरातील श्रेयाची पहिली लढाई थांबली नसतानाच आता राष्ट्रवादी आणि सत्ताधारी भाजपत श्रेयाचे राजकारण रंगले आहे. आम्ही केलेल्या विकासकामांचे भाजप दुसऱ्यांदा उद्‌घाटन करीत त्याचे श्रेय लाटत असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते योगेश बहल यांचे म्हणणे आहे. तर, राष्ट्रवादीने घाईघाईने केलेल्या अपूर्ण विकासकामांचे निवडणुकीच्या तोंडावर उद्‌घाटन केलेले असल्याने ती आम्ही पूर्ण करून त्याचे लोकार्पण करीत आहे, असे उत्तर सत्ताधारी भाजपचे गटनेते एकनाथ पवार यांनी यावर दिले आहे. 

शहराचा मॉडेल वॉर्ड असलेल्या संभाजीनगरमधील जलतरण तलावाचे दुसऱ्यांदा भाजपने आज उद्‌घाटन केल्याने राष्ट्रवादीने त्याचा काळे झेंडे दाखवून निषेध केला. हाच नव्हे, तर पिंपरीगावातीलही अजित पवार यांनीच उद्‌घाटन केलेल्या जलतरण तलावाचेही काम अपूर्ण असून ते पूर्ण केल्यानंतर येत्या काही दिवसात त्याचेही उद्‌घाटन करणार असल्याचे एकनाथ पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या अशा अर्धवट कामाची यादी तयार करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आता आपली सत्ता गेली आहे, याचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विचार करावा, असा टोमणाही त्यांनी मारला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख