Tur Dal Raj Thakre | Sarkarnama

तूर खरेदी न केल्यास राज्यभर आंदोलन करू - राज

सुचिता रहाटे
मंगळवार, 25 एप्रिल 2017

'सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्र सुरू केली. परंतु, सुरुवातीपासूनच ह्या ना त्या कारणाने शेतकऱ्यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. कधी म्हणाले, गोदामात जागा शिल्लक नाही, कधी बारदान उपलब्ध नाही म्हणाले तर कधी वजनकाटे नसल्याचे कारण सांगितले गेले - राज ठाकरे

मुंबई - सरकारने सर्व तूर खरेदी केंद्रे येत्या २४ तासात सुरू करावीत आणि शेतकरी घेऊन आलेली सर्व तूर ताबडतोब सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाने खरेदी करावी अन्यथा आम्ही सर्व राज्यभर आंदोलने करू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

शेतकरी सरकारच्या भरवशावर घरदार सोडून तिथे आला आहे आणि लाखो क्विंटल तूर प्रत्येक खरेदी केंद्रावर शिल्लक असतानाही खरेदी केंद्र बंद केली जात आहेत. 'शेतकरी घेऊन येतील ती सर्व तूर खरेदी करू' असं आश्वासन सरकारच्या वतीने मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले होते. परंतु, सरकार कडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

''सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्र सुरू केली. परंतु, सुरुवातीपासूनच ह्या ना त्या कारणाने शेतकऱ्यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. कधी म्हणाले, गोदामात जागा शिल्लक नाही, कधी बारदान उपलब्ध नाही म्हणाले तर कधी वजनकाटे नसल्याचे कारण सांगितले गेले आणि बरीच खरेदी केंद्रं सतत बंदच ठेवण्यात आली. शेतकरी तूर घेऊन आले पण त्यांना ताटकळत ठेवण्यात आले. यावरूनच सरकारचा उद्देश स्पष्ट होतो.'' असेही राज ठाकरे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख