Tur Dal | Sarkarnama

शेतकरी चिंता'तूर'..विरोधक दूर...दूर

कैलास शिंदे
बुधवार, 26 एप्रिल 2017

संघर्ष यात्रेमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोश आल्याने भविष्यात शेतकऱ्यांसाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जोमाने आंदोलन करतील अशी आशा वाटत होती. परंतु, अवघ्या दहा दिवसातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नांगी टाकल्याचे दिसून येत आहे.

जळगाव - शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेससह विरोधी पक्षातर्पे राज्यभरात संघर्ष यात्रा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातही संघर्ष यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या एकतेची ताकद दाखवित संघर्ष यात्रा यशस्वी केली. त्यामुळे दोन्ही पक्षाला 'टॉनिक'मिळाले असे जनतेला वाटत होते. परंतु, तूर खरेदीबंदमुळे शेतकऱ्यांमागे आंदोलनाच्या रूपाने उभे राहण्याची गरज असताना मात्र दोन्ही पक्ष नेमक्‍या याच काळात मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे संघर्ष यात्रेनंतरची ही 'अ'संघर्षता काय?असा प्रश्‍न आता जनतेला पडला आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या दुसरा टप्पा बुलढाणा जिल्ह्यातील जिजामाता जन्मस्थळ शिंदखेडराजा येथून सुरू करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात यात्रेचे जोरदार स्वागत झाले. जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी संघर्ष यात्रेत सहभाग घेतला. जळगाव जिल्ह्याची सीमा सुरू होत असलेल्या मुक्ताईनगरपासून तर थेट अमळनेर तालुक्‍यापर्यत संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला.

संघर्ष यात्रेमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोश आल्याने भविष्यात शेतकऱ्यांसाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जोमाने आंदोलन करतील अशी आशा वाटत होती. परंतु, अवघ्या दहा दिवसातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नांगी टाकल्याचे दिसून येत आहे. जळगावसह राज्यात शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा प्रश्‍न गंभीर आहे. जळगाव जिल्ह्यातही खरेदीची गंभीर परिस्थिती आहे. 'नाफेड'ने खरेदी बंद केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात अद्यापही 30 हजार क्‍विटंल तूर शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.

'नाफेड'चा साडेपाच हजाराचा भाव असतांना व्यापाऱ्यांकडे केवळ 3800 ते 4000 रूपये दर आहे. अशा स्थितीत काय करावे, हे शेतकऱ्यांपुढे प्रश्‍न चिन्ह आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्‍नासाठी विरोधकांनी पुढे येण्याची गरज होती. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फारसे आक्रमक झालेले दिसत नाहीत. आघाडीचे सरकार असतांना भाजप व सेना विरोधी पक्षात होते. त्यावेळी भाजपचे एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते व विद्यमान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची आक्रमक आंदोलने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुभवली आहेत.

त्या आंदोलनांच्या माध्यमातून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडून या नेत्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. तूर खरेदीबाबत आक्रमक आंदोलन तर सोडाच; परंतु, त्यांबाबत आवाज उठविण्यासही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुढे सरसावल्याचे दिसत नाही. त्यामुळे शेतकरी तूर खरेदीबाबत चिंताग्रस्त असताना विरोधक दूर का आहेत, असा प्रश्‍न पडला आहे

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख