आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तुरीची मंत्रालयाच्या दारात विक्री

 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तुरीची मंत्रालयाच्या दारात विक्री

मुंबई : परदेशातून आणलेल्या तुरीला हजारो रूपयाचा भाव देणाऱ्या आणि राज्यात विक्रमी उत्पादन झालेल्या तुरीची खरेदी करण्यास दिरंगाई करणाऱ्या फडणवीस सरकारच्या विरोधात मराठवाडा, विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीची विक्री करून आपला संताप व्यक्‍त करण्यात आला. संयुक्त जनता दलाच्या राज्य शाखेकडून तूर विक्रीचे हे आंदोलन छेडण्यात आले होते. यात शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच बैलगाडीत बसून तूर विकण्याचे अभिनव आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. यात मराठवाडा, विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या-यांच्या शेतातून आणलेल्या शंभर किलोहून अधिक तुरीची विक्री केली. 

राज्यातील लाखो शेतकऱ्यांकडील तूर खरेदी सरकारने थांबविल्यामुळे या शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे, मात्र सरकारला या विषयी फारसे गांभीर्य नसल्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोरच तूर विक्रीचे हे आंदोलन छेडण्यात आले अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश जदयुचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांनी रक्त आटवून तूर पिकवलेली आहे. ती सारीच्या सारी तूरडाळ राज्य सरकारने विकत घेतली पाहिजे. केवळ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर घेऊ असे चालणार नाही. तूर डाळ व्यापारातील दलालांशी हात मिळवणी करून सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान करु नये. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय द्यावा, अशी या आंदोलनामागची आपल्या पक्षाची भूमिका असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. 
"भाजपच्या तुरी, शेतकऱ्यांना मारी', "शेतकरी वाचवा, देश वाचवा' अशा घोषणा देत आज मंत्रालयाच्या दारात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातली तूर आणि तूर डाळीची विक्री केली. यात पोलिसांसोबत मंत्रालयातील अनेक अधिकाऱ्यांनी एका तासाच्या आतच शंभर किलोहून अधिक तुरीची खरेदी केली. यावेळी तूर विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांनी तूर खरेदी थांबवणाऱ्या राज्य सरकारचा निषेध केला. जदयुच्या नेत्या वर्षाताई निकम आणि आजिनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. 
यावेळी महाराष्ट्र प्रदेश जदयुचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील, मुंबईचे अध्यक्ष शशांक राव, जदयुचे नेते अतुल देशमुख, डॉ. कैलास गौड हे उपस्थित होते. राज्य सरकारकडून विदेशी व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा छळ सुरु आहे. त्याचा निषेध करणाऱ्यासाठी यवतमाळ, करमाळा, पंढरपूर येथून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला, शेतकरी कार्यकर्त्यांनी शेतातली तूर डाळ आणली होती. बैलगाडीत बसून शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या दारात तूर विकली. सरकारचा निषेध करत झालेल्या या तूर विक्रीला मुंबईकर नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तासाभरातच शंभर किलो तूर मुंबईकरांनी विकत घेतली. शेतकऱ्यांची तूर विकत घेऊन आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत हे दाखवून दिले. पती आत्महत्याग्रस्त कुटुंबातील भारती परमेश्वर पाटील आणि कर्जबोजा असलेल्या कुटुंबातील रेखा हरिभाऊ हसतबांते या शेतकरी महिलांच्या शेतातील तूर विक्री यावेळी करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com