मुंढेंचे पक्केच; कार्यभार स्वीकारण्याची प्रतीक्षा; नागपूरकरांत उत्सुकता - Tukaram Mundhe Will Surely Take Charge of Nagpur Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

मुंढेंचे पक्केच; कार्यभार स्वीकारण्याची प्रतीक्षा; नागपूरकरांत उत्सुकता

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 जानेवारी 2020

मुंढे महापालिकेत येणार असल्याच्या वृत्ताने नागपूरकरांत त्यांच्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांचे विरोधकही तक्रारीची फाइल घेऊन बसले आहेत. महापालिकेतही त्यांच्या स्वागताची लगबग दिसून येत आहे

नागपूर : बदली आदेशाला दोन दिवस होऊनही आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकेत दाखल न झाल्याने त्यांची नागपुरातील नियुक्ती रद्द झाल्याच्या अफवांनी जोर धरला. मात्र, तुकाराम मुंढे यांचे महापालिकेत येणे निश्‍चित असल्याचे प्रशासनातील उच्चस्तरीय सूत्राने नमूद केले. येत्या दोन-तीन दिवसांत ते नागपुरात येण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली.

मंगळवारी सायंकाळी राज्य एड्‌स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदावरून तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीचे आदेशही त्यांच्यासह महापालिकेतही पोहोचले. त्यांना तत्काळ कार्यभार घेण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले होते. त्यामुळे ते बुधवारी मुंढे नागपुरात पोहोचतील, अशी चर्चा होती. मात्र, ते न आल्याने कालपासून त्यांची बदली रद्द झाल्याच्या चर्चेला ऊत आला. 

बदली होऊन तिसऱ्या दिवशीही ते नागपुरात पोहोचले नाही. त्यामुळे ही बदली रद्द झाल्याची चर्चा होती. परंतु, मुंबईतील मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्राने त्यांचे नागपुरात येणे निश्‍चित असल्याचे नमूद केले. राज्य एड्‌स नियंत्रण सोसायटी कार्यालयातील काही कामे आवरल्यानंतर ते नागपुरात पोहोचणार आहेत. त्यांची बदली रद्द होण्याची किंचितही शक्‍यता नसल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. येत्या दोन-तीन दिवसांत ते महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तविली. 

मुंढे महापालिकेत येणार असल्याच्या वृत्ताने नागपूरकरांत त्यांच्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांचे विरोधकही तक्रारीची फाइल घेऊन बसले आहेत. महापालिकेतही त्यांच्या स्वागताची लगबग दिसून येत आहे. आयुक्त कक्षात आवराआवर सुरू असून प्रशासकीय इमारतीत विविध प्रजातींच्या झाडांच्या कुंड्या व्यवस्थितरीत्या ठेवण्यात येत आहे. त्यांच्या कामाची धडाडी बघता कुठेही काहीही चुकू नये, यासाठी अधिकारी स्वतः त्यांचा कक्ष व परिसरावर लक्ष ठेवून आहेत.

आयुक्त बांगर यांना दोन दिवसांत 'पोस्टिंग'

आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूर महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले असले तरी आयुक्त अभिजित बांगर यांनाही कुठेही 'पोस्टिंग' दिले नाही. मात्र, सध्या मंत्रालयात संथगतीने त्यांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी एक-दोन दिवसांत त्यांना योग्य तिथे पोस्टिंग मिळेल, असा विश्‍वासही मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्राने व्यक्त केला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख