तुकाराम मुंढे यांना जिवे मारण्याची चौथ्यांदा धमकी 

तुकाराम मुंढे यांना जिवे मारण्याची चौथ्यांदा धमकी 

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना आज पुन्हा निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी आली आहे. विशेष म्हणजे आज आलेले हे गेल्या महिन्याभरातील चौथे पत्र असून चारही पत्रातील अक्षर एकाच व्यक्तीचे असल्याचे स्पष्ट होत आहे. 

यावेळी पाठविलेल्या पत्रात आधी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 1975 साली अशाच प्रकारे केलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस अद्याप करू शकले नाही. त्यामुळे मी आताही सापडणार नाही, माझे पोलिसांना खुले आव्हान आहे, असे या पत्रात म्हटले आहे. ही चारही पत्रे पोस्टाने पाठविण्यात आली आहेत. आधी तुमच्या कुटुंबियांना मारू, मग तुमचे हातपाय तोडू, असा उल्लेख या पत्रात आहे.

आजच्या पत्राच्या अनुषंगाने मुंढे यांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या पत्रानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून पोलिसांनी आरोपीला तातडीने शोधून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंढे यांनी "पीएमपीएमएल'ची सूत्रे स्वीकारून आज सहा महिने पूर्ण झाली. या काळात धडाकेबाज कामाने मुंढे यांनी "पीएमपीएमएल'मध्ये बरीच सुधारणा घडवून आणली आहे.

बस खरेदीचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. अनेक जुन्या बस दुरूस्त करून रस्त्यावर आणल्या आहेत. प्रवासीसंख्या वाढून उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. पीएमपीच्या ताफ्यात ठेकेदारांच्या बस मोठ्याप्रमाणात असून या ठेकेदारांना वेसन घालण्यात मुंढे यशस्वी झाले आहेत. या सुधारणा करताना अनेकांवर त्यांची कारवाई केली. त्यामुळे काही घटक दुखावले असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिसांनी या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे व आरोपीला तातडीने जेरबंद करावे, अशी भावना पीएमपी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

मुंढे यांची कामाची पद्धती धडाकेबाज आहे. याआधी नवी मुंबई महापालिकेत आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी केलेली अतिक्रमण कारवाई बरीच गाजली होती. त्यावेळी अनेकजण दुखावले होते. तेथील नगरसेवकांनी त्यांच्या बदलीची मागणी केली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com