Tukaram Munde stops unnecessary works worth 300 crore | Sarkarnama

आयुक्त तुकाराम मुंडेंचा असाही धडाका : 30 दिवसांत  300 कोटींच्या कामांना कात्री ! 

संपत देवगिरे :  सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 19 मार्च 2018


"प्राधान्यक्रम, कामांची गरज व अनावश्‍यक खर्चांना फाटा देण्याला प्राधान्य दिले जात आहे. केवळ आर्थिक स्थिती नव्हे तर सबंध प्रशासन गतिमान करण्यात येईल. महापालिकेचे हित समोर  ठेऊनच कामकाजाच्या सुचना दिल्या आहेत. भविष्यात त्याला अधिक गती येईल.''

- तुकाराम मुंडे, आयुक्त, नाशिक महानगरपालिका. 
       

नाशिक :  महिन्यापूर्वी महापालिकेत शहरातील आमदार बोले व प्रशासन हाले अशी स्थिती होती. शहरापेक्षा राजकारण्यांच्या हिताला महत्व होते. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आयुक्त म्हणुन कार्यभार स्विकारल्यावर राजकारण्यांना महापालिकेच्या पोर्चमध्ये वावरणेही कठीण बनले.

या तीस दिवसांत  कडक शिस्त , तपासणीनंतरच मंजुरी व राजकीय हस्तक्षेप बंद या त्रिसूत्रीतुन तीनशे कोटी वाचवले. महापालिकेवरील भविष्यातील देण्यांचे ओझे वेगाने हलके होऊ लागल्याने तो चर्चेचा विषय बनलाय. 

पुणे महापालिका परिवहन महामंडळाचे कार्यकारी संचालक पदावरुन तुकाराम मुंडे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. त्यांनी आपल्या कामकाजाला 16 फेब्रुवारीला प्रारंभ केला. बैठका, प्रशासनाला गती देण्यासाठी काटेकोर शीस्त व राजकीय हस्तक्षेपाऐवजी प्रशासकीय हिताला प्राधान्य याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना स्पष्ट सुचना दिल्या. त्यात पहिला बळी गेला तो सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या सोयीसाठी सुचवलेले 257 कोटींच्या रस्त्यांच्या कामांचा !

 खरेतर या कामांना  महासभेने मंजुरी दिली होती. मात्र दोन वर्षांपूर्वीच सिंहस्थात शहरातील सर्व रस्ते केले होते. लगेचच ही गरज कशी निर्माण झाली?. याचा खुलासा प्रशासनाला करता आला नाही. त्यामुळे ही कामे एका फटकाऱ्यात रद्द झाले. 45 कोटींचे रस्ते कॉंक्रीटीकरणाचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. प्राधान्याचा विषय नसल्याने आयुक्त मुंडेंनी हा विषय आता बाद केला.

साडे तेरा कोटींचे विविध प्राकलने प्राधान्यक्रमाचा विषय नव्हता. तरीही काही पदाधिकारी तो पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत होते. त्याची चौकशी झाल्यावर ही कामे का होणार आहेत ? याचेच अनेकांना आश्‍चर्य वाटले. त्यामुळे तीस दिवसांच्या कामकाजात महापालिकेचे सुमारे 313 कोटींची बचत झाली आहे. 
 

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने महिन्यापूर्वी तो चिंतेचा विषय होता. मात्र त्यावर कुणाचेही नियंत्रण नव्हते. सुमारे 834 कोटींचे स्पील ओव्हर होते. ही देणी देण्याचे नियोजन तिजोरीतुन करण्यात अडचणी होती. महिनाभरात तीनशे कोटींहून अधिक बचत झाली. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराला दिशा मिळाली आहे.

येत्या काही दिवसांत महापालिकेची अडखळलेली गाडी सुरळीत व वेगाने धावेल ही अपेक्षा करता येईल. यातुन जो संदेश गेला त्यात राजकीय नेते, नगरसेवकांचे एजंट यांचा महापालिकेतील वावर आपोआप बंद झाला. त्यातुन कर्मचारी, नागरिकात  स्पष्ट संदेश गेल्याने कृष्णकांत भोगे, प्रविण गेडाम यांच्यानंतर पहिल्यांदा कारभाराला शिस्त  आल्याचे चित्र आहे.
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख