Tukaram Munde says , he saved 30 crore rupees | Sarkarnama

तुकाराम मुंडे म्हणाले, तीस कोटी वाचवले म्हणून तर नगरसेवक ओरडताहेत 

संपत देवगिरे 
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

आम्ही नागरीक काटकसर करतो. घरचा खर्च वाढला तर दोन एैवजी एक क्वार्टर पितो. तसे तुम्ही काही करता काय?

- एका ज्येष्ठ  नागरिकाने मुंडेंना प्रश्न विचारलेला प्रश्न 

नाशिक :  "खर्च वाढला तर आम्ही दोन एैवजी एकच 'क्वार्टर'  पितो. तशी तुम्ही काय काटकसर केली?' असा मासलेवाईक प्रश्‍न आज एका ज्येष्ठाने थेट महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांना विचारला. त्यावर उपस्थितांतही चलबिचल झाल्याने त्यांनी त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला. 

मात्र आयुक्त मुंडे यांनी "दरवर्षी खड्डे बुजवायला चाळीस कोटी रुपये खर्ची पडतात. यंदा मी केवळ दहा कोटी खर्च केले व त्यापेक्षा जास्त खड्डे बुजवले. म्हणूनच तर नगरसेवक माझ्या नावाने ओरडतात.'' असे सडेतोड उत्तर दिले. 

महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांचा शनिवारी  नाशिक रोडला शिखरेवाडी येथे वॉक वुईथ  कमिशनर  कार्यक्रम होता. त्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बत्तीसहून अधिक नागरीकांनी आपल्या अडचणी सांगीतल्या. मात्र हा दौरा गाजला तो ज्येष्ठाच्या मासलेवाईक प्रश्‍नाने. 

"आम्ही नागरीक काटकसर करतो. घरचा खर्च वाढला तर दोन एैवजी एक क्वार्टर पितो. तसे तुम्ही काही करता काय?' त्याच्या या प्रश्‍नांनी उपस्थितांत एकाचवेळी हशा आणि नाराजीही व्यक्त झाली. मात्र आयुक्त मुंडे यांनी नागरिकांना शांत करत "त्यांना बोलु द्या. प्रश्‍न विचारु द्या.'' असा हस्तक्षेप केला. 

त्यानंतर आयुक्तांनी त्याला उत्तर दिले. मात्र त्यावरही हा ज्येष्ठ थांबतच नसल्याने मुंडे यांनी आपल्या शैलीत त्याला 'आता थांबा. माझे ऐकून  घ्या आधी' असे वरच्या पट्टीत सांगीतल्यावर तो थाबंला. 

यावेळी मुंडे  म्हणाले," गरजेनुसार कामे. आवश्‍यकता असले तरच कामे. यावर प्रशासन भर देत आहे. त्याविषयी मी अत्यंत काटेकोर आहे. दरवर्षी खड्डे बुजवायला चाळीस कोटी खर्च होतात. यंदा केवळ दहा कोटी खर्च झाले. नेहेमीपेक्षा जास्त खड्डे बुजवले गेले. ही काटकसरच झाली ना? त्यामुळेच तर नगरसेवक माझ्या नावाने ओरडतात.'' असे सांगीतल्याने उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख