नागपुरात तुकाराम मुंढेंचा फतवा : कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशीही मुख्यालय सोडणे अवघड

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परिपत्रक काढून महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. विशेषतः कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांत चांगलाच धाक निर्माण झाला आहे. विभागप्रमुख व इतर अधिकाऱ्यांनी सूचनांचे पालन करणे आवश्‍यक असल्याचे नमूद केले.
 नागपुरात तुकाराम मुंढेंचा फतवा : कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशीही मुख्यालय सोडणे अवघड

नागपूर : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी शिस्तीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु, बहुतांश विभागप्रमुख, विभागीय अधिकारी शिस्तीचे पालन करीत नसल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला. विशेष म्हणजे आता महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुटीच्या दिवशीही परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. याबाबतचा फतवाही आयुक्तांनी काढल्याने अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. 

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परिपत्रक काढून महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. विशेषतः कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांत चांगलाच धाक निर्माण झाला आहे. विभागप्रमुख व इतर अधिकाऱ्यांनी सूचनांचे पालन करणे आवश्‍यक असल्याचे नमूद केले. आयुक्तांच्या परिपत्रकानुसार कर्मचारी, अधिकाऱ्यांना आता रजेचे अर्ज पोस्टाने पाठविता येणार नाही. सार्वजनिक सुटीच्या दिवशीही आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. सातत्याने कार्यालयात विलंबाने येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीचा सामना करावा लागणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामानिमित्त कार्यालय सोडताना वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागणार आहे. विभागातील रजिस्टरमध्ये नोंद करावी लागणार आहे. तसेच कार्यालय सोडल्याची व कार्यालयात परत आल्याची वेळ नमूद करावी लागणार आहे. 

महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, राष्ट्रीय सणानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे आवश्‍यक असून अनुपस्थितीत राहिल्यास गैरवर्तवणुकीची कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. स्थायी समिती, महासभेची बैठक कार्यालयीन वेळेनंतरही सुरू असल्यास उपस्थित राहणे आवश्‍यक असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. कार्यालय परिसर तसेच कक्ष स्वच्छ ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यालयात खुर्ची, टेबल, आलमारी नादुरुस्त असेल तरी दुरुस्त करून घेणे, कार्यालयाबाहेर तुटलेल्या खुर्च्या, टेबल दिसणार नाहीत, याचीही काळजी कर्मचाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. 

आयुक्तांच्या फतव्यातील वैशिष्ट्ये 
- सुट्या मंजूर केल्याशिवाय वेतन मिळणार नाही. 
- तीन दिवस विलंब झाल्यास एका दिवसाची सुटी कमी करण्यात येईल. 
- कार्यालयीतील भिंतीवर कुठलाही कागद, परिपत्रक दिसल्यास कारवाई. 
- अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर बंधनकारक. 
- अधिकारी, कर्मचाऱ्यांना विभागप्रमुखांकडेच आवश्‍यक बाबींची मागणी करावी लागेल. 
- अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन झाल्यास प्रशासकीय कार्यवाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com