हगवणेंना पाहताच पवार म्हणाले, "काय बुवा, आज म्हशीच्या धारांची व्यवस्था काय केली?``

....
sharad-pawar-hagwane
sharad-pawar-hagwane

मुळशी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तुकारामबुवा हगवणे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 95 व्या वर्षी नुकतेच निधन झाले. तुकारामबुवा गेल्याने पुरोगामी विचारांची कास धरून तालुक्‍याचा सर्वांगीण विकास करणारा एक मोठा नेता हरपल्याचे दुःख मुळशीकरांना झाले आहे. त्यांच्या जाण्याने मुळशीतील सामान्यांचे प्रश्‍न सोडविणारा एक निष्काम कर्मयोगी हरपल्याची भावना मुळशीकरांची झालेली आहे. गेली 25 वर्ष मला कार्यकर्ता म्हणून नाही तर स्वत:च्या मुलाप्रमाणे वागवले असल्याने माझा व त्यांचा अतिशय जवळून संबंध आलेला आहे.

शरद पवारसाहेबांचे नेतृत्व मोठं व्हावं म्हणून पवारसाहेबांपेक्षा वयाने मोठे असलेल्या कार्यकर्त्यांचा एक समूह पुणे जिल्ह्यात होता. त्यामधे उभी हयात खर्ची घातलेले स्व. शिवाजीराव कोंडे, स्व. सदाशिवराव झेंडे, स्व. माधवराव टापरे आदी होत. त्यापैकी तुकारामभाऊ हगवणेंचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. सातत्याने पंचायत राज व्यवस्थेत त्यांनी सन 1967 ते 1997 अशी 30 वर्षे मुळशी तालुका पंचायत समिती व पुणे जिल्हा परिषदेत काम केलं. त्याअगोदर त्यांनी सन 1956 ते 1967 मध्ये भुकूम ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत व जीवनाच्या अखेरपर्यंत फक्त आणि फक्त शरद पवार यांचेच नेतृत्व त्यांना मानले. दरवर्षी जसा वारकरी पंढरीची आषाढीची वारी नित्यनेमाने करतो, तसेच तुकारामभाऊंनी अगदी या वर्षी देखील वयाच्या 95 व्या वर्षी पवारसाहेबांना दिवाळी पाडव्याला बारामतीला भेटण्यात खंड पडू दिला नाही. शरद पवारांची 50 वर्षांची संसदीय कारकीर्द आहे. त्याचप्रमाणे शरद पवारांमागे 50 वर्षे उभे राहणारे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून तुकारामबुवांची काळाला नोंद घ्यावी लागेल.

मुळशीच्या राजकारणातील एकनिष्ठतेची व्याख्या लिहिताना तुकारामबुवांची इतिहासाला दखल घ्यावी लागेल. मिळालेली सत्तेची खुर्ची ही शोभा मिरवण्यासाठी नसून सामान्य जनतेची सेवा करण्याचे साधन आहे, असे सातत्याने त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले व स्वतः कृतीत आणले. पंचायतराज व्यवस्थेत तुकारामभाऊंनी एका बाजूला प्रचंड सार्वजनिक विकास कामांचा डोंगर उभा केला; तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेची वैयक्तिक कामे मार्गी लावली. तालुक्‍यातील रस्ते, शाळा, गटार योजना, पाणीपुरवठा योजना, आरोग्य केंद्र, वीज अशी एक ना अनेक कामे केली. तालुक्‍यात पाझर तलावांची व बंधाऱ्यांची निर्मिती करून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देऊन त्यांना सक्षम करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम त्यांनी केले. भूगाव, भुकूम शिवेवरील पाझर तलाव त्यांच्या कर्तृत्वाची आज साक्ष देत आहे. शेतकरी हितासाठी त्यांनी हयातभर कष्ट उपसले. गावागावातील तंटे, शेतकऱ्यांचे बांधावरील प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी अहोरात्र काम केले.

पुणे शहरात मुळशीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विशेषतः भारती विद्यापीठात त्यांनी अनेकांना मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला. तालुक्‍यांतील अनेक गावात डॉक्‍टर, इंजिनिअर झालेले तरून तुकारामभाउंचे नाव काढत असतात.

तुकारामभाऊंनी सन 1970 ते 1979 या कालावधीत नानासाहेब नवले यांच्याबरोबर उपसभापती म्हणून काम केलं. सन 1979 मध्ये पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले. पुढे सन 1983 ते 1988 या कालावधीत पवारसाहेबांनी पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती म्हणून त्यांना काम करण्याची संधी दिली. पुढे 1992 ते 1997 या कालावधीत त्यांनी पुन्हा मुळशी तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केलं. या सर्व ठिकाणी काम करत असताना ते चारित्र्यसंपन्न जीवन जगले. सार्वजनिक जीवनात त्यांच्यावर विरोधकांनी देखील कधीही आरोप केला नाही. पांढरा शुभ्र नेहरू सदरा, तसेच धोतर व टोपी असा रुबाबदार त्यांचा पेहराव असायचा. करडा आवाज व रांगड्या ग्रामीण भाषाशैलीतुन माणसांशी संवाद साधणारे धारदार वक्तृत्व असल्याने लोकांना आपलेसे वाटणारे नेतृत्व तुकारामभाऊंचे होते. उभी हयात एक निष्कलंक चारित्र्यसंपन्न जीवन ते जगले. त्यांची आई ते लहान असताना गेली. त्यामुळे काही कळायच्या आत लहानपणापासूनच त्यांनी स्वावलंबन अंगीकारले होते. तुटेल, मोडेल; पण वाकणार नाही, असा प्रचंड स्वाभिमानी बाणा त्यांच्या अंगी होता. म्हणूनच आत एक व बाहेर दुसरे, असे त्यांनी कधीच केले नाही. स्पष्ट व परखड विचारसरणी असल्याने लोकांना त्यांनी दिलेला निर्णय मान्य करावा लागायचा.

राजकारणात आमदार होण्याची संधी हुकल्याने पवारसाहेबांवरचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही. अथवा पक्षबदलाचा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. आज नेत्याने वा पक्षाने मला काही दिले नाही; तर लगेच रात्रीतून पक्ष बदलणारे व नेते बदलणारे कार्यकर्ते आपण पाहतो. तुकारामभाऊंचे जीवन हे अशा दलबदलू कार्यकर्त्यांसाठी एक सक्षम उदाहरण आहे. आज बदलत्या युगात राजकारणाची समीकरणे बदलताना आपण पाहत आहोत. नेत्यांच्या पुढे- पुढे करणारे अनेक कार्यकर्ते आपण पाहतो. दौऱ्यात नेत्याला आपल्या घरी नेण्यासाठी कार्यकर्ता धडपड करीत असतो. मी जेव्हा तुकारामभाऊ व पवारसाहेबांच्या संबंधाबद्दल विचार करतो, त्यावेळी वरीलपैकी कोणत्याही प्रकाराचा अवलंब केल्याचे दिसून येत नाही.

शरद पवारसाहेब हे गेल्या पंचवीस वर्षात कधीही तुकारामभाऊंच्या घरी आल्याचे मी पाहिलेले नाही. एव्हाना त्यापूर्वी देखील साहेब कधीही हगवणेंच्या घरी आलेले मी ऐकले नाही. हगवणे दिवाळी पाडव्याव्यतीरिक्त जर काम असेल तरच फार फार तर वर्षातून दोनदा किंवा तीनदाच साहेबांना भेटायचे. मी तुकारामभाऊंना एकदा म्हणालो, "पवारसाहेबांना आपण भुकूमला घरी का आणत नाही?' त्यावर ते म्हणाले, "साहेबांना आपल्याला मोठं करायचं ना? मग आपणच त्यांचा वेळ घेत बसलो, तर ते मोठे कसे होतील? आपली श्रद्धा जर साहेबांवर असेल; तर त्याकरता पुढेपुढे करणे मला पटत नाही.' असा उदारमतवादी स्वभावाचा नेता मी पाहिला नाही. पवारसाहेब मुख्यमंत्री असताना सन 1994 मध्ये आम्ही रात्री मुंबईला वर्षा बंगल्यावर भेटायला गेलो. हगवणेंना पाहताच साहेब म्हणाले, "काय बुवा, आज म्हशीच्या धारांची व्यवस्था काय केली?' म्हणजे साहेबांना आपला कार्यकर्ता कुठल्या वेळेला काय करतो, याची अचूक माहिती असते. यावरूनच साहेब व तुकारामभाउंच्या संबंधांची प्रचिती आपणाला येते.

आज तुकारामभाऊ हगवणे गेल्याने मुळशी तालुक्‍यांतील एक ज्येष्ठ नेत्याला तालुका गमावून बसला आहे. सर्वसामांन्याची कामे करणारा त्यांना आपला वाटणारा, आपल्या परिवारातील कोणीतरी कर्ता गेल्याचं दु:ख मुळशीकरांना झालेलं आहे. अंत्यविधीला जमलेला हजारोंचा जनसमुदाय याची साक्ष आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com