पाड्यावरच्या आदिवासीचं पोर...आज बनलेय 'कोरोना फायटर'! - Tribals Doctor Son Fighting as Corona Fighter | Politics Marathi News - Sarkarnama

पाड्यावरच्या आदिवासीचं पोर...आज बनलेय 'कोरोना फायटर'!

हर्षल गांगुर्डे 
सोमवार, 6 एप्रिल 2020

पोटापूरती शेती, पावसाळ्यात अतिवृष्टी पण उन्हाळा म्हंटला की पिण्याचे पाण्याचे हाल, शेतीवर पोटाची भूक मिटली नाही की मग मिळेल ते काम करायचे. आर्थिक चणचण असतांना एका आदिवासी बापानं पोराला शिकवलं आज तो डॉक्‍टर म्हणून कोरोना विरोधातील युद्धात देशाचा शूर शिपाई म्हणून काम करतोय

चांदवड : पोटापूरती शेती, पावसाळ्यात अतिवृष्टी पण उन्हाळा म्हंटला की पिण्याचे पाण्याचे हाल, शेतीवर पोटाची भूक मिटली नाही की मग मिळेल ते काम करायचे. आर्थिक चणचण असतांना पोराला शिकवलं आज तो डॉक्‍टर म्हणून कोरोना विरोधातील युद्धात देशाचा शूर शिपाई म्हणून काम करतोय याचा अभिमान असून त्याच्या कामाबद्दल लोकांकडून होणारं कौतुक ऐकलं की केलेल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान वाटतं..... हे शब्द आहेत डॉ. हेमराज यांचे वडील काशीनाथ दळवी यांचे. हेमराज सध्या नाशिकच्या कोरोना कशात 'कोरोना फायटर' म्हणून यशस्वी काम करत आहेत.

आई सिंधुबाई व वडील काशीनाथ यांचा हेमराज एकुलता एक मुलगा. दिंडोरी तालुक्‍यातील संगमनेर या आदिवासी गावातील जन्म. आजूबाजूची परिस्थिती शिक्षणाला प्रतिकूल, अशात अल्पभूधारक शेतकरी असलेल्या माय-बापाचे काबाड कष्ट बघत हेमराज ने शिक्षणाच्या जोरावर ही परिस्थिती बदलायचे स्वप्न बघितले. अतिवृष्टीने झोपडीवजा कुडाचा निवारा वाहून गेला. यात सगळं वाहून गेलं. पण एक गोष्ट तरून राहिली ती म्हणजे हेमराज चे स्वप्न.

प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतचे शिक्षण दिंडोरी तालुक्‍यात तर उच्च माध्यमिक शिक्षण पंचवटी नाशिक विद्यालयात झाले. वस्तीगृहावर प्रती महिना मिळणारे पैस अन घरून मिळणाऱ्या मोजक्‍या पैशांवर हेमराज यांनी आडगाव मेडिकल कॉले ला एमबीबीएस तर नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. डी. केले.

शासनाच्या वैद्यकीय सेवेते प्रवेश केला. शेकडो रुग्णांच्या सेवेबरोबर त्यांनी आरोग्यविषयक जनजागृती चे देखील काम केले. कोरोनाच्या संकटाची चाहूल लागताच त्यांची नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना कशात नियुक्ती झाली असून ते पूर्ण ताकदीने या संकटाविरोधात दोन हात करतायत. एकेकाळी झोपडीवजा घर वाहून गेलेल्या आदिवासी अल्पभूधारक शेतकऱ्याच्या या मुलाचा प्रवास अनेक आदिवासी बांधवाना शिक्षणासाठी प्रेरणा देणारा ठरतोय. या प्रवासात पत्नी कुंदन हिची देखील मोलाची साथ लाभत आहे.

डॉ. हेमराज यांचा प्रवास जवळून बघितला आहे. अतिशय गरिबी व आदिवासी भागातून डॉक्‍टर होऊन त्याने आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलंय. आज कोरोना फायटर म्हणून लढतांना बघून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. - डॉ. हेमंत घांगळे, न्याय वैद्यक शास्रज्ञ, जिल्हा रुग्णालय, नाशिक.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख