IPS कृष्णप्रकाश यांचा आदर्श ठेवून आदिवासी तरूण बनला PSI - tribal boy selected as psi | Politics Marathi News - Sarkarnama

IPS कृष्णप्रकाश यांचा आदर्श ठेवून आदिवासी तरूण बनला PSI

शांताराम काळे
शुक्रवार, 20 मार्च 2020

बँकेतून डीजेसाठी कर्ज काढले, मात्र त्यावेळी एका आर्थिक दामदुप्पट करणाऱ्या एका कंपनीत एजन्ट झालो. तेथे खूप फसलो. ती कंपनी बोगस निघाली. त्यामुळे काढलेले कर्जही त्या कंपनीत बुडाले. इतरांनी बचत करण्यासाठी गुंतवलेली रक्कमही बुडाल्याने मी खूप निराश झालो.

अकोले (नगर):  हॉटेल कामगार, टपरी चालक, मजुरी अशी कामे करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर आदिवासी समाजातील संतोष वाळींबा देशमुख हा पोलीस उपनिरीक्षक बनला. नगरचे यापूर्वीची पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या जीवनाचा आदर्श घेवून हे यश मिळविल्याचे तो अभिमानाने सांगतो.

संतोषने सविस्तर मुलाखतीत आपला प्रवास उलगडला. 

प्रश्न : अभ्यासासाठी घरचे वातावरण कसे होते ?
देशमुख : राजूरच्या डोंगरमाळावर एक एकराच्या तुकड्या तुकड्यात विखुरलेली शेतजमिनीवर पावसाळ्यात भातपीक घेऊन वडील वाळींबा देशमुख यांनी आपली चार मुले लहानाची मोठी केली. स्वतः काबाड कष्ट करून वडिलांनी आम्हाला शिक्षण दिले. मी मोठा मुलगा. इयत्ता नववीपासून एका हॉटेलमध्ये काम करीत होतो. आलेल्या पैशातून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवत होतो. दहावीनंतर समशेरपूर येथे शिक्षक असलेले अशोक डोळस या मामांकडे शिक्षण घेतले. पुन्हा राजूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेवून बी.ए. झालो. शिक्षणासाठी पैसे लागायचे. त्यामुळे पानटपरी टाकली. एम. ए. साठी पुणे येथे जाऊन अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर पुन्हा राजूर गावी येऊन व्यवसाय शोधू लागलो. बँकेतून डीजेसाठी कर्ज काढले, मात्र त्यावेळी एका आर्थिक दामदुप्पट करणाऱ्या एका कंपनीत एजन्ट झालो. तेथे खूप फसलो. ती कंपनी बोगस निघाली. त्यामुळे काढलेले कर्जही त्या कंपनीत बुडाले. इतरांनी बचत करण्यासाठी गुंतवलेली रक्कमही बुडाल्याने मी खूप निराश झालो. एकदा तर आपले जीवन संपवावे, असे ठरवून मी पुणे येथे गेलो. मात्र तेथूनच माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. मित्र प्रशांत देशमुख याने माझे मनपरिवर्तन केले. एमपीएससी अभ्यासक्रमाबाबत सांगितले. त्यामुळे मी उभारी धरली. तीन वर्ष सातत्याने सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत ग्रंथालयात बसून अभ्यास केला.

प्रश्न : हे यश मिळविताना कोणाचा आदर्श डोळ्यासमोर होता ?
देशमुख : नगरला पोलिस आधीक्षक म्हणून कृष्णप्रकाश यांनी आपल्या कामाची वेगळी शैली दाखवून दिली. त्यांच्याविषयीच्या बातम्या मी कायम वाचायचो. त्यांनी काही मोठ्या राजकीय नेत्यांना गजाआड केले. त्यांच्या कामाचा आदर्श घेवून कायम वाटत असे की आपणही पोलिस खात्यातच नोकरी करावी. आपणही पोलिस अधिकारी व्हावे. तिच जिद्द मनात ठेवून माझ्या जीवनाचे लक्ष्य केले. 

प्रश्न : यशस्वी होण्यात कोणाची मदत मिळाली ?
देशमुख : मित्रांचे उपकार मी कधीही विसरणार नाही. मित्र प्रशांत देशमुख, रवींद्र भांगरे, किरण देशमुख, प्रकाश घारे यांनी मला वसतिगृहात सांभाळून तीन वर्षे माझी काळजी घेतली. तीन वेळा मी केवळ एक किंवा दोन मार्काने नापास झालो. मात्र जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास डळमळीत होऊ दिला नाही. चौथ्यांदा मात्र परीक्षा पास होऊन पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. वडील मजुरी करायचे, आई पोषण आहार शिजविण्यासाठी काम करीत असे. परंतु त्यांनी आम्हाला शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. देशमुखवाडी व राजूर ग्रामस्थांनी माझ्या या जिद्दीला दाद देत माझा नागरी सत्कार केला, त्या वेळी खूप आनंद झाला. माझ्या यशासाठी राजूर येथील सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख