दुचाकीवर विनाकरण फिरणाऱ्यांना आता पोलिसांचा असाही धडा! : वाचा आणि सावध व्हा #CURFEW

पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आता कठोर निर्णय घेण्यास सुरवात केली असून जिल्ह्यात काटेकोरपण संचारबंदीची अंमलबजावणी होईल, याकडे लक्ष दिले आहे.
loni-police-two-wheeler action
loni-police-two-wheeler action

लोणी काळभोर : संचारबंदी लागू असतानाही तुम्ही विनाकारण दुचाकी घेऊन रस्त्यावर फिरत असाल तर आत्ताच शहाणे व्हा! ण लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच, संबधितांच्या दुचाकीही लॉकडाऊन संपेपर्यंत जप्त करण्याचे आदेश जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना आणि अतिमहत्त्वाच्या कामांसाठीच बाहेर पडलेल्यांना या कारवाईतून वगळले जाणार असले तरी, नागरिक विनाकारण रस्त्यावर आल्यास मात्र संपूर्ण जिल्ह्यात दुचाकी जप्त करण्याबरोबरच संबधितांच्यावर कलम 188 अऩ्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याची माहिती संदीप पाटील यांनी यावेळी दिली. 

संदीप पाटील यांचा आदेश मिळाल्यापासुन अवघ्या चोवीस तासांत लोणी काळभोर पोलिसांनी लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरल्याप्रकरणी पन्नांसहुन अधिक दुचाकी जप्त केल्या आहेत. तर दुचाकीवर फिरणाऱ्या शंभरहुन अधिक जणांवर संचारबंदीचे उल्लघंन केल्याप्रकरणी कलम 188 अऩ्वये गुन्हे दाखल केले असल्याची माहिती लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली. 

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरु नये यासाठी पोलिसांनी विनंती करुनही, नागरीक विविध खोटी कारणे पुढे करुन रस्त्यांवर येत असल्याचे चित्र  जिल्ह्यात दिसुन येत आहे. सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पोलिसांनी वारंवार दंडुक्याची भीती दाखवुनही, नागरिक औषधे, भाजी किंवा किराणा सामानाचे कारण पुढे करत रस्त्यावर येत आहेत. कायद्याचा धाक दाखवुनही, नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्यानेच, पोलिसांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतल्याचे बंडगर यांनी सांगितले.

बंडगर म्हणाले की लोणी काळभोर पोलिस ठाण्याची हद्द ही पुणे शहराला लागुन असल्याने, पुणे-सोलापूर, हडपसर- सासवड व लोणीकंद ते केसनंद मार्गे थेऊर फाटा या तीन प्रमुख रस्त्यांवर दुचांकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील चोवीस तासांच्या काळात पन्नासहुन अधिक दुचाकी जप्त केल्या असुन, यापुढील काळात वरील कारवाई आणखी तीव्र करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, कुजीरवाडी व कदमवाकवस्ती या प्रमुख गावात ही कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

दुचाकी जप्तीची कारवाई 14 एप्रिलपर्यंत चालणार- संदीप पाटील

याबाबत अधिक माहिती देतांना पोलिस अधिक्षक संदीप पाटील म्हणाले, ``वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आपआपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरील कारवाई काटेकोरपणे करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्ते व गावागावातील चौक अशा सर्वच ठिकाणी प्रत्येक भागात पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना आणि अतिमहत्त्वाच्या कामांसाठीच बाहेर पडलेल्यांना या कारवाईतून वगळले जाणार आहे. मात्र विनाकारण फिरणाऱ्या एकाही वरील कारवाईतुन सुट दिली जाणार नाही, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com