राजस्थानातील पहिली 'तृतीयपंथी' पोलिस सेवेत भरती - Transgender joins police force in Rajashthan | Politics Marathi News - Sarkarnama

राजस्थानातील पहिली 'तृतीयपंथी' पोलिस सेवेत भरती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गंगा कुमारी ही राज्यातील पहिली तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होणार आहे. गंगा 2013 साली परीक्षा उत्तीर्ण झाली होती, त्यानंतर पोलिस वर्दीचा अधिकार मिळावा यासाठी तिने मोठी लढाई लढली. 

जोधपूर : राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गंगा कुमारी ही राज्यातील पहिली तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होणार आहे. गंगा 2013 साली परीक्षा उत्तीर्ण झाली होती, त्यानंतर पोलिस वर्दीचा अधिकार मिळावा यासाठी तिने मोठी लढाई लढली. 

राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश मेहता यांनी 13 नोव्हेंबर रोजी, शहर पोलिस विभागाला ऑर्डर मिळाल्यापासून सहा आठवड्यात गंगाला 2015 पासून मिळणाऱ्या लाभांसह नियुक्त करण्याचे आदेश दिले. ट्रान्सजेंडरना इतरांप्रमाणे समान अधिकार आहेत त्यात लिंगाच्या आधारे भेदभाव केला जाऊ शकत नाही, असे न्यायाधीशांनी सांगितले.

गंगा ही राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील जेकेरी या गावातील रहिवासी आहे. 2013 साली तिने पोलिस भरतीची परीक्षा दिली होती. गंगा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिची जालोर पोलिसात नियुक्ती झाली होती. पण वैद्यकीय परीक्षणात ती ट्रान्सजेंडर आहे असे आढळून आले. भरतीसाठीच्या अर्जात तिसऱ्या लिंगासाठी पर्याय नसल्यामुळे तिने 'स्त्री' हा पर्याय निवडला. याबाबत स्पष्टीकरणसाठी आय.जी.पी.(जोधपूर रेंज) यांच्याकडे तिने दाद मागितली होती त्यानंतर ही केस गृहमंत्रालयाकडे गेली, पण तिथेही ती 2015 सालापर्यंत अनिर्णितच राहीली. पण तेथूनही काही निष्कर्ष न मिळाल्याने तिने न्यायालयात धाव घेतली. 

'परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा मी निराश होते. माझी पोलिस शिपाई पदाची नियुक्ती ही केवळ मी तृतीयपंथी असल्याने रोखून धरण्यात आली होती आणि पोलिस प्रशासन माझ्या नियुक्तीबाबत व श्रेणीबाबत काही निर्णय देत नव्हते. सुनावणीसाठी उच्च न्यायालयात जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, आणि मला आनंद आहे की, न्यायालयाने तृतीयपंथीयांच्या दुःखाची दखल घेतली आणि माझी नियुक्ती केली' असे गंगा म्हणाली. 

गंगा आता तिची ट्रान्सजेंडर बहिण गीता हीला सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा करत आहे, ती सध्या पदव्युत्तर शिक्षण घेत असून प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी करत आहोत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख