Town planning officers not accepting transfer orders | Sarkarnama

नगर रचनाकार नगर विकास विभागाचे ऐकेनात  बदलीचे आदेश धुडकावत असल्याने विभागाची पंचाईत 

संजीव भागवत : सरकारनामा न्यूज ब्युरो 
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

यामुळे नगर रचनाकार हे नगर विकास विभागाचे ऐकेनात, असे चित्र विभागात निर्माण झाले असल्याने विभागाकडून अशा अधिकाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्याचा बडगा उगारला जाणार आहे. 

मुंबई:नगर विकास विभागाने केलेल्या बदलीचे आदेश राज्यातील अनेक नगर रचनाकार व त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून विविध कारणे समोर करून धुडकावले जात असल्याने विभागाची मोठी पंचाईत झाली आहे.

शासकीय नियमाप्रमाणे गट-अ मध्ये येणाऱ्या या नगर रचनाकार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीने बदली व त्यांच्या पदस्थापनेचे आदेश विभागाकडून दिले जात असताना त्या आदेशालाच हे अधिकारी डावलत आहेत. यामुळे नगर रचनाकार हे नगर विकास विभागाचे ऐकेनात, असे चित्र विभागात निर्माण झाले असल्याने विभागाकडून अशा अधिकाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्याचा बडगा उगारला जाणार आहे. 

मागील काही महिन्यांमध्ये नगर विकास विभागाकडून अनेक नगर रचनाकारांची पदोन्नतीने बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी विभागाकडून परिपत्रकही जारी करण्यात आले मात्र यातील अनेक अधिकाऱ्यांनी वैद्यकीय कारण देत रजेवर जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तर काहींनी प्रशासकीय कारणे समोर करुन आहे त्याच ठिकाणी राहण्यात यश मिळवले आहे.

वैद्यकीय कारण समोर करून बदली नाकारणाऱ्यांमध्ये सातारा येथील नगर रचनाकार मोहनसिंह मंडवाले, धुळे येथील रचनाकार सतीश वाणी, पिंपरी चिंचवड येथील भूमि संपादन विशेष अधिकारी मिलिंद आवडे, औरंगाबाद येथीाल सहायक संचालक नगर रचना मुल्यांकन अधिकारी स.पुं. कोठावदे, अकोला येथील नगर रचनाकार चं.र. निकम आदींचा समावेश आहे. यात चं.र. निकम, सतीश वाणी, आदींनी वैद्यकीय कारण समोर केले आहे तर स.पुं कोठावदे यांनी प्रशासकीय कारण दाखवले आहे. बदलीचे आदेश मिळाल्यानंतर यातील अनेक अधिकाऱ्यांनी रजेचा अर्ज टाकला असल्याने कामकाजाची मोठी अडचण निर्माण झाली असल्याने नगर विकास विभागाने या अधिकाऱ्यांच्या संदर्भात शासन निर्णय जारी करून या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्यांनी बदली करण्यात आलेल्या नियुक्‍तीच्या ठिकाणी हजर न झाल्यास वा त्यासाठी राजकीय दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गोपनीय अहवालात नोंद घेण्यात येईल असा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे. त्यासोबतच राजकीय दबावाबाबतची कृती महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम 3(3) व 23 चे उल्लंघन असल्यामुळे ती गैरवर्तणूक समजून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशाराही विभागाने दिला आहे. 

औरंगाबाद येथीाल सहायक नगररचनाचे स.पुं. कोठावदे यांची बदली ही नांदेड-परभणी येथे नगर रचनाकार मुल्यांकन तज्ज्ञ या पदी पदस्थापनेने करण्यात आली आहे. तर अकोला येथील नगर रचनाकार यांची नंदूरबार, मोहनसिंह मंडवाले यांची साताऱ्याहून सोलापूर, सतीश वाणी यांची धुळ्याहून पिंपरी चिंचवड येथे आणि पिंपरी चिंचवड येथील मिलिंद आवडे यांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे. मात्र मागील अनेक महिन्यांपासून या अधिकाऱ्यांनी बदलीचे आदेश विभागाकडून देण्यात आलेले असताना त्या आदेशाला खो घालत आहे त्याच ठिकाणी आपले बस्तान कसे बसविता येईल प्रयत्न केले आहेत. यासाठी वैद्यकीय कारणे समोर केली असली तरी आता विभागाकडून या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईसाठी पावले उचलली आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख