कोरोनामुळे अनाथ बनलेल्या सार्थकची यशोमती ठाकूरांनी केली विचारपूस

सार्थकचीआईच्या मायेने विचारपूस केली.
कोरोनामुळे अनाथ बनलेल्या सार्थकची यशोमती ठाकूरांनी केली विचारपूस
Yashomati Thakur meet Sarthak, who lost his parents due to corona

नागपूर : कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील अनेक बालके अनाथ झाल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनामुळे कुणाची आई दगावली आहे, तर कोणाचे वडील मृत्युमुखी पडले आहेत. काही बालकांचे तर आई-वडिल या दोघांचेही कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या नशिबी एकाकी अनाथपण आले आहे.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या अशाच एका बालकाची शनिवारी (ता. ६ जून) राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्याच्या घरी जाऊन स्वत: विचारपूस केली. चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या सार्थक नरेश तिजारे या बालकाच्या आई-वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे सध्या तो अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा या गावात आपल्या मामांकडे राहत आहे. या संकटात एकट्या पडलेल्या सार्थकची महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आईच्या मायेने विचारपूस केली. (Yashomati Thakur meet Sarthak, who lost his parents due to corona)

कोरोनामुळे राज्यातील अनेक मुलांवर अनाथ होण्याची वेळ आली आहे. अशा या सर्व मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सरकारने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे, अशी माहिती या वेळी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. 

या योजनेचा लाभ 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालक, ज्यांच्या दोन्ही पालकांचे 1 मार्च 2020 किंवा त्यानंतर कोविड-19 च्या संसर्गामुळे निधन झाले आहे, अशा बालकांना होणार आहे. या कालावधीत कोविड संसर्गामुळे एका पालकाचा आणि इतर कारणाने दुसऱ्या पालकाचा मृत्यू झाला आहे, अशा बालकांचाही समावेश आहे. तसेच, एक मार्च 2020 पूर्वी कोणत्याही कारणाने एका पालकाचा आणि त्यानंतर कोविड संसर्गाने एका पालकाचा मृत्यू झाला आहे, अशा बालकांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय देण्यात आलेले आहे. अनाथ झालेल्या मुलांच्या नावे प्रत्येकी 5 लाख रुपये मुदत ठेव ठेवली जाणार आहे. ही मुले 21 वर्षांची झाल्यावर त्यांना व्याजासह ही रक्कम मिळेल. तसेच, अशा अनाथ झालेल्या बालकांची माहिती नागरिकांनी संबंधित यंत्रणांना दिल्यास त्या मुलांना मदत करता येईल, असे आवाहनही मंत्री यशोमती ठाकूर यांनी या वेळी केले.

Related Stories

No stories found.