तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी दिला प्रवरेच्या कामगारांना चलेजावचा इशारा

आंदोलनाचा आज दहावा दिवस होता.
तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी दिला प्रवरेच्या कामगारांना चलेजावचा इशारा
andolan.jpg

राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे दोनशे कामगार मागील पाच वर्षातील थकित वेतन व इतर २५ कोटी ३६ लाखांच्या मागणीसाठी उपोषण व धरणे आंदोलन करीत आहेत. आंदोलनाचा आज दहावा दिवस होता. आंदोलकांनी धरणे, रस्तारोको आदी मार्ग वापरूनही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने अखेर कामगारांनी आज आंदोलन अधिक तीव्र केले.

कारखान्यावर विखे पाटलांची सत्ता आली आहे. त्यामुळे कारखान्याच्या विविध शिक्षण संस्थांवर विखे प्रवरा संस्था व कारखान्याचे कामगार नियुक्त करत असल्याचा आरोप कामगार करत आहेत. आज आंदोलनाच्या दहाव्या दिवशी सर्व आंदोलकांनी कारखाना संलग्न श्री विवेकानंद नर्सिंग होम, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, श्री लक्ष्मीनारायण औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ट्रस्ट, पेट्रोल पंप येथे जाऊन, प्रवरेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चले जाव. असा नारा देऊन, यापुढे फिरकू नये, असा इशारा दिला.

हेही वाचा...

खासदार डॉ. सुजय विखे व कारखान्याच्या संचालक मंडळाने मागील तीन-चार दिवसांत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, लेखी प्रस्तावात ठोस असा थकीत देय देण्याचा कालावधी निश्चित नसल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

कामगार नेते इंद्रभान पेरणे म्हणाले, "तालुक्यात हजारो उच्चशिक्षित तरुण बेरोजगार असतांना प्रवरेचे अधिकारी व कर्मचारी कारखान्यात व संलग्न संस्थांमध्ये पाठविले. त्यांना नियमित वेतन व प्रवास भत्ता मिळतो. राहुरी कारखान्याच्या कामगारांना मात्र दुजाभावाची वागणूक देऊन, वेतन थकविले. प्रवरेचे कामगार तुपाशी तर, राहुरीचे कामगार उपाशी अशी परिस्थिती आहे.  त्यामुळे, राहुरीची कामधेनू मोकळी करा. अन्यथा उद्यापासून तीव्र आंदोलन छेडू. असा इशारा दिला आहे."

कामगारांची मुले मैदानात...!
आंदोलनाचा तिढा सुटत नाही. कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार डॉ. सुजय विखे व कारखान्याचे संचालक मंडळ दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप करून, कामगारांच्या तरुण मुलांनी वेगळ्या आंदोलनाची चूल मांडून, मैदानात उतरण्याचा इशारा दिला आहे. योगेश राऊत, संकेत ठुबे, सिद्धार्थ उगले, ओंकार तारडे, कृष्णा शिवले, प्रद्युम्न नालकर, प्रतीक जाधव, ओम उगले, सचिन सोनवणे, सौरभ निकम, राज ओहोळ, रोहित सोनवणे व इतर तरुणांनी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना निवेदन दिले. 

हेही वाचा...

निवेदनात म्हटले की, "२३ ऑगस्टपासून आमचे पालक न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. परंतु, अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. घरातील कर्ते पुरुष आंदोलन करीत असल्याने, उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरात किराणा व अन्नधान्य संपल्याने उपासमार सुरू झाली आहे. सव्वा महिन्यापासून कारखान्याचा वीजपुरवठा खंडित असल्याने कामगार वसाहतीमध्ये अंधार आहे. त्यामुळे, ऑनलाइन शिक्षणाचा खेळखंडोबा होऊन, कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे. पालकांच्या उपोषण व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत्या शुक्रवारी (ता. ३) सकाळी सकाळी वाजता कामगारांची सर्व मुले राहुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत." असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.

एकूणच, कारखान्याच्या आंदोलक कामगारांची मुलांनीही वेगळ्या आंदोलनाची चूल मांडण्याचे ठरविल्याने, तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांच्या आंदोलनाची धार आणखी तीव्र होणार आहे.

Related Stories

No stories found.