तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी प्रवरेकडून आलेल्या अधिकाऱ्याच्या तोंडाला फासले काळे

आंदोलनाचा आज अकरावा दिवस होता.
तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी प्रवरेकडून आलेल्या अधिकाऱ्याच्या तोंडाला फासले काळे
rahuri.jpg

राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे दोनशे कामगार मागील पाच वर्षातील थकित वेतन व इतर २५ कोटी ३६ लाखांच्या मागणीसाठी उपोषण व धरणे आंदोलन करीत आहेत. आंदोलनाचा आज अकरावा दिवस होता. आंदोलकांनी धरणे, रस्तारोको आदी मार्ग वापरूनही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने अखेर कामगारांनी आज आंदोलन अधिक तीव्र केले.

आज (गुरुवारी) सकाळी अकरा वाजता प्रवरेचा एक जण श्री विवेकानंद नर्सिंग होम येथे कामासाठी आल्याची माहिती समजताच संतप्त आंदोलकांनी नर्सिंग होमकडे धाव घेतली. सुमारे दीडशे आंदोलक कामगारांनी नर्सिंग होमचा कानाकोपरा तपासला.

हेही वाचा...


प्रवरा कारखान्याचे अकौंट विभागातील अविनाश खर्डे यांना कामगारांनी बाहेर काढले. त्यांच्या अंगावर काळे ऑइल ओतण्यासाठी एक आंदोलक कामगार पुढे सरसावला. परंतु, कामगार नेते इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सीताराम नालकर व इतरांनी संतप्त कामगारांना शांत केले. प्रवरेला संदेश देण्यासाठी खर्डे यांच्या फक्त तोंडाला काळे ऑइल फासावे, असे संतप्त कामगारांना समजावले. खर्डे यांना काळे ऑइल फासल्यावर त्यांना तात्काळ निघून जाण्यास सांगण्यात आले.  

आंदोलनाकडे दुर्लक्ष करणारे कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार डॉ. सुजय विखे व कारखान्याच्या संचालक मंडळाचा निषेध करून, कामगारांनी शेवटचा रुपया घेईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.  असा इशारा दिला.  

हेही वाचा...

उद्या (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता कामगारांच्या मुलांनी राहुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.  त्यामुळे, आंदोलनाचे दिवस वाढत आहेत. तसतसा कामगारांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सहनशीलता संपू लागली आहे.  त्यामुळे, आंदोलनाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे.

Related Stories

No stories found.