मोहोळला दुसरा आमदार मिळणार का? 
Will Mohol get another MLA?

मोहोळला दुसरा आमदार मिळणार का? 

राज्यपालनियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नेमणुकीबाबत राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्‍याला दुसरा आमदार मिळणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पुणे : राज्यपालनियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नेमणुकीबाबत राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्‍याला दुसरा आमदार मिळणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या वेळी नाही पण यावेळी तरी माजी आमदार राजन पाटील यांच्या नावाचा विचार होईल, अशी अपेक्षा सोलापूर जिल्ह्यातून व्यक्त केली जात आहे. 

राजन पाटील यांनी आजवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंद केले आहे. त्यांच्या निष्ठेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतर पक्षातील नेतेही आदरायुक्त बोलत असतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनेक नेते सोडून गेले. पण, राजन पाटील यांनी मात्र शरद पवार यांच्यासोबत राहणेच पसंद केले. 

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एका सभेत बोलताना त्यांनी,"जशा इतरांना ऑफर होत्या, तशा मलाही होत्या. मात्र, मी गेलो नाही आणि कधीही जाणार नाही. शरद पवार हाच आमचा विचार आहे,' असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. 

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. त्यावेळी राजन पाटील यांच्यासारखे काही नेते राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत ठामपणे उभे राहिले होते. त्यामुळे पक्षात चैतन्य निर्माण झाले होते. त्याकाळात राजन पाटील यांच्या कौतुकाच्या पोस्ट सोशल मीडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांकडून पोस्ट करण्यात येत होत्या. त्या वेळी पाटील यांची एक "क्रेझ' निर्माण झाली होती. 

मोहोळ मतदारसंघात प्रभावी संघटन असलेल्या राजन पाटील यांनी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, रमेश कदम आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. पाटील यांनीही या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे. तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावर त्यांचे संपूर्ण वर्चस्व आहे. 

राजन पाटील यांचा एक महिन्यापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत विचार व्हावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आली होती. पण, त्यांना संधी मिळाली नाही. तरीही कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त न करता त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संधी मिळालेल्या शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. माध्यमाशी बोलताना,"कोणाला कधी संधी द्यायची, हे शरद पवार साहेबांना माहिती आहे. ते जो निर्णय घेतील, तो मला मान्य आहे,' अशी प्रतिक्रिया दिली होती. आता या खेपेला तरी त्यांना संधी मिळावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. 

Related Stories

No stories found.