नगरमधील ‘हेविवेट’ नेत्यांशी लढणं शिवसेनेला सोपं वाटतं का हो !

१९९५ मध्ये युतीचे सरकार आले. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे युतीचे शिल्पकार होते. गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ हातात हात घालून दोन्ही कॉंग्रेसला चारीमुंड्याचित केले ते युतीने.
नगरमधील ‘हेविवेट’ नेत्यांशी लढणं शिवसेनेला सोपं वाटतं का हो !
Sanjay raut.jpg

नगर : नगर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ हेविवेट नेत्यांचे आहेत. त्यांना धक्के देणे तसे सोपेही नाही. शिवसेनेला जर जिल्ह्यात हातपाय पसरायचे असतील, तर भरपूर मेहनत घ्यावी लागेल. केवळ गर्जना करून काहीही साध्य होणार नाही.

१९९५ मध्ये युतीचे सरकार आले. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे युतीचे शिल्पकार होते. गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ हातात हात घालून दोन्ही कॉंग्रेसला चारीमुंड्याचित केले ते युतीने. हा सर्व इतिहास असला, तरी युतीमध्ये २०१४ मध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू झाला. त्यापूर्वी तो नव्हता, असे नव्हे. पण, बाळासाहेबांसमोर त्यांचे काहीही चालत नसे. शिवसेनेच्या मागे भाजपला फरफटतच जाण्याशिवाय पर्यायही नव्हता. नरेंद्र मोदींचा देशाच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला आणि देशाचे राजकारण पार बदलून गेले. मोदी जेव्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आले, तेव्हा शिवसेना त्यांच्यामागे उभी होती. पुढे ते पंतप्रधान झाले. काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागली अन्‌ युतीला भगदाड पडले. पंचवीस वर्षांची युती तुटली. भाजपला असा विश्वास होता, की मोदी लाटेत राज्यात भाजप स्वबळावर सत्तेवर येईल. पण, तसे काही झाले नाही. १२२ जागांवर समाधान मानावे लागले. मोदी लाटेतही उद्धव ठाकरे यांनी चांगली कामगिरी करून दाखविली होती.

भाजपबरोबर जाण्यास नकार

पुढे पुलाखालून बरेच पाणी गेले आणि पुन्हा शिवसेना सत्तेत आली. हलकीफुलकी खाती घेऊन मानाअपमान सहन करीत राहिली. २०१४ मध्ये युती अखंड राहिली असती, तर कदाचित शिवसेनेचा मुख्यमंत्री त्याचवेळी बनला असता. पण, भाजपला तसे करायचे नव्हते. भाजपचा मुख्यमंत्री हवा होता. जो पक्ष राज्यात शिवसेनेचे बोट धरून मोठा झाला होता, तोच शिवसेनेचा मोठा भाऊ बनला. २०१४ ते २०१९ पर्यंत जे काही राजकारण झाले, ते शांतपणे पाहात बसले ते उद्धव ठाकरे. पुढे २०१९ ची निवडणूकही युतीनेच लढली. भाजपच्या जागा आणखी कमी झाल्या. भाजपकडे बहुमत नाही, हे लक्षात येताच उद्धवनी भाजपबरोबर जाण्यास नकार दिला. थेट दोन्ही कॉंग्रेसबरोबर आघाडी करून मुख्यमंत्री बनले. म्हणजे २०१४ चे उट्टे त्यांनी २०१९ ला काढले असे म्हणावे लागेल.

हेही वाचा..

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी काल (शनिवारी) सोनई येथे बोलताना व्यक्त केला. तसेच नगर जिल्हा साखर सम्राटांचा असला, तरी तो यापुढे शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असेही ते म्हणाले.

सुभेदारांशी सोप नाही

मुळात प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये गैर असे काही नाही. पण, इतर जिल्ह्यांपेक्षा नगर जिल्ह्याचे राजकारण निश्‍चितपणे वेगळे आहे. नगर शहर आणि पारनेरमध्ये शिवसेनेचे दोन आमदार निवडून येत असंत. आता ते तालुके राष्ट्रवादीकडे गेला आहे. नगर शहरात अनिल राठोड आमदार होते. ते आज नाहीत. नेवासे मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. जिल्ह्याचा विचार करता, असे लक्षात येते की गडाखांकडे जर जिल्ह्यातील पक्षाची जबाबदारी आली, तर काहीसे वेगळे चित्र निर्माण झालेले दिसेल. पण, मुळात जिल्ह्यातील राजकारण सोयऱ्याधायऱ्यांचे आहे. प्रत्येक मतदारसंघात वजनदार नेते आहेत. त्यांना धक्के देणे तसे सोपेही नाही. शिवसेनेला जर जिल्ह्यात हातपाय पसरायचे असतील, तर भरपूर मेहनत घ्यावी लागेल.

आज प्रत्येक मतदारसंघाकडे पाहिले तर लोक मुद्दाम वेगळा विचार करणार नाहीत. येथील साखर कारखानदारीवर अर्थकारण अवलंबून आहे. हजारो कुटुंबांचा चरितार्थ सहकारावर चालतो. जे गडाख शिवसेनेत आहेत, तेही साखरसम्राट म्हणूनच ओळखले जातात. त्यांची शिवसेनेची ओळख उशिराची आहे. शेवटी राहतो प्रश्‍न असा की, जर आघाडी पाच वर्षे टिकणार असे, राऊत यांना वाटत असेल, तर येथील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला बरोबर घेऊन चालावे लागणार आहे. कोणीही आपला मतदारसंघ दुसऱ्यासाठी सोडणार नाही.

आणखी दोन-तीन वर्षांनी काय होईल, हे आज सांगता येत नसले, तरीही शिवसेनाबरोबर नसेल, तर काय होते, याचा अनुभव भाजपवाले आज घेत असतील. जी युती पंचवीस वर्षे टिकली. जी युती हिंदुत्वाच्या मुद्यावर होती, त्या शिवसेनेची साथ सोडणेही योग्य नव्हते. पण, राजकारणात काहीही होऊ शकते. कोणी कोणाचा मित्र आणि शत्रूही नसतो, हे ही तितकेच खरे. 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.