लशीचा साठा संपल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे लसीकरण बंद

पुढच्या लसीकरणालाही ब्रेक लागण्याची भीती आहे.
लशीचा साठा संपल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे लसीकरण बंद
Vaccination of corona in Pimpri Chinchwad stopped due to non-availability of vaccine

पिंपरी : कोरोनावरील लस उपलब्ध नसल्याने पिंपरी चिंचवड शहरातील ५९ लसीकरण केंद्रे उद्या (शुक्रवारी, ता. ९ एप्रिल) बंद ठेवण्याची आफत श्रीमंत असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेवर आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी त्याला दुजोरा दिला. 

एकीकडे शहरात कोरोनावरील रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा आणि काळाबाजार सुरु असताना या आजाराची प्रतिबंधक लसही संपल्याने प्रकोप झालेल्या या साथीला नियंत्रण आणण्याच्या उपाय योजनेला तूर्त करकचून ब्रेक लागला आहे. टक्केवारी न मिळाल्याने काल पालिकेच्या स्थायी समितीने रेमडीसिव्हीर इंजेक्शन खरेदीचा प्रस्ताव स्थगित केल्याचा आरोप झाला आहे. 

तर, दुसरीकडे आता कोरोना लसीचा साठाच संपल्याने दररोज होणारे आठ हजारांवर रहिवाशांचे लसीकरण उद्या  (शुक्रवारी, ता. ९ एप्रिल) होणार नाही. हे डोस मिळाले नाही, तर पुढच्या लसीकरणालाही ब्रेक लागण्याची भीती आहे. लसीचा साठा प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू असून तो उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण केंद्र नियमीत सुरू करण्यात येतील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, रेमडीसिव्हीरचा काळाबाजार केल्याने तीन मोठ्या खासगी रुग्णालयांना महापालिकेने गुरुवारी नोटीस बजावली आहे. ही रुग्णालये संबंधित इंजेक्शन रूग्णालयाबाहेर ऍ़डमिट असलेल्या रूग्णांना अधिक किंमतीने विकत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल यांचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलचे अधिष्ठीता तथा वैद्यकिय अधीक्षक यांना ही नोटीस बजावली आहे.

सद्यस्थितीत रेमडेसिवीर विक्रीच्या या प्रथेमुळे लोकांमध्ये असंतोष  निर्माण झाला असून त्याबाबत  पुढील ४८ तासांत स्पष्टीकरण देण्यास या रुग्णालयांना सांगण्यात आले आहे. अन्यथा साथरोग अधिनियम, १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ नुसार  कारवाई कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.