राज्यांना केंद्राच्या दराने लस द्या! अशोक चव्हाण यांची मागणी - Vaccinate states at central rate! Demand of Ashok Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यांना केंद्राच्या दराने लस द्या! अशोक चव्हाण यांची मागणी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

१८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने राज्यांवर टाकली आहे, तर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी केंद्र सरकार लसपुरवठा करणार आहे.

मुंबई : कोरोनाची लस केंद्राला अवघ्या १५० रुपयांत मिळणार असून, हीच लस राज्यांना ४०० रुपयांत खरेदी करावी लागणार आहे. कोरोना लशीतील हा दुजाभाव संपवून राज्यांनाही केंद्राच्याच दराने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज केली.

१८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने राज्यांवर टाकली आहे, तर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी केंद्र सरकार लसपुरवठा करणार आहे; परंतु एकंदर लोकसंख्येत १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे प्रमाण सुमारे ४० टक्के असून, ४५ वरील नागरिकांचे प्रमाण जेमतेम २० टक्के आहे. याचाच अर्थ केंद्राच्या तुलनेत राज्यांना जवळपास दुप्पट लसीकरण करावे लागणार असून, केंद्रापेक्षा राज्यांची लस खरेदी जास्त असणार आहे. अशा परिस्थितीत राज्यांना स्वस्त किंवा किमान केंद्र सरकारच्याच दरात लस मिळणे आवश्यक आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

मुळातच केंद्राच्या तुलनेत राज्यांची आर्थिक क्षमता कमी असून, राज्यांचे आर्थिक स्त्रोतही मर्यादित आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता लशीच्या दराचा केंद्र आणि लस उत्पादकांनी पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. एकट्या महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या सुमारे ५.५० कोटींच्या घरात आहे. प्रत्येक नागरिकाला दोन लशी द्यायच्या असल्याने महाराष्ट्राला एकूण ११ कोटी लशी खरेदी कराव्या लागतील. एका लशीची किंमत ४०० रुपये या दराने महाराष्ट्राला चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम त्यासाठी खर्च करावी लागेल, याकडे अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे.
 

हेही वाचा...

कोरोनाचा त्रास, त्यात "खाकी'कडून मनःस्ताप 

शेवगाव : तालुक्‍यात कोरोना इतकीच पोलिसांच्या खाक्‍या वर्दीचीही दहशत निर्माण झाली आहे. तपासणीच्या नावाखाली दोन दिवस ऑक्‍सिजन सिलिंडर सारख्या जीवनावश्‍यक वस्तूचे वाहन पोलीस ठाण्यात अडकवून रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार नुकताच झाला. या घटनेमुळे पोलीस जनतेच्या सोयीसाठी आहेत, की गैरसोयीसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

कोरोना काळात शेवगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी मात्र या काळात विनाकारण दुकानदार, नागरिक, अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या संस्थांना लक्ष्य करून कारवाईची भिती दाखवत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरातील संत एकनाथ रुग्णालयासाठी ऑक्‍सिजन सिलिंडर नेणाऱ्या वाहनाची खातरजमा न करता चौकशीच्या नावाखाली तब्बल दोन दिवस पोलीस ठाण्यात अडकवून ठेवले. त्यामुळे अत्यावश्‍यक परिस्थितीत रुग्णांच्या जिविताशी खेळण्याचा हा प्रकार शेवगाव पोलीस ठाण्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनी केला. मात्र नंतर तहसिलदारांच्या चौकशीनंतर संबंधित वाहन सोडून देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातून नेमके काय साध्य झाले. ही बाब गुलदस्तात राहिली. हे वाहन सोडले असते, तर काही रुग्णांचे प्राण वाचले असते. 
 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख