खेड पंचायत समितीचे ते सदस्य पुन्हा सहलीवर : नवा सभापती शिवसेनेचा की राष्ट्रवादीचा?

सभापती पोखरकरांवरील अविश्वास ठरावाच्या राजकारणाला हिंसक वळण लागल्यानंतर त्यांना अटकही झाली.
Those members of Khed Panchayat Samiti went on a trip again: Curiosity about the new sabhapati
Those members of Khed Panchayat Samiti went on a trip again: Curiosity about the new sabhapati

राजगुरुनगर (जि. पुणे) : शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर, खेड पंचायत समितीच्या नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलेले बहुतांश पंचायत समिती सदस्य पुन्हा सहलीवर गेले आहेत. पुढचा सभापती राष्ट्रवादीचे अरुण चौधरी, शिवसेनेच्या सुनीता सांडभोर की वैशाली जाधव होणार, याबाबत खेड तालुक्यात प्रचंड उत्सुकता आहे. (Those members of Khed Panchayat Samiti went on a trip again: Curiosity about the new sabhapati)

सभापती पोखरकरांवरील अविश्वास ठरावाच्या राजकारणाला हिंसक वळण लागल्यानंतर त्यांना अटकही झाली. त्यानंतर ३१ मे रोजी, शिवसेनेच्याच सहा सदस्यांनी बंडखोरी केल्याने, त्यांच्यावरील अविश्वास ठराव सहज मंजूर झाला. आता सभापतीपदासाठी निवडणूक जाहीर होईल. मात्र शिवसेना आक्रमक पवित्र्यात असल्याने सभापतीपदाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलेले बहुतांश बंडखोर शिवसेना सदस्य आणि राष्ट्रवादीचे व भाजपचे सदस्य सहलीला गेले आहेत. या घडामोडींच्या सूत्रधारांनी, खबरदारी म्हणून ठराव मंजूर झाल्यादिवशीच या सदस्यांना पुन्हा सुरक्षित स्थळी हलविले आहे. बहुतांश सर्व सदस्यांचे मोबाईल फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर अथवा बंद असल्याचा संदेश फोनवर ऐकावयास मिळत आहे. 

खेड पंचायत समितीचे सभापतिपद पहिल्या अडीच वर्षासाठी अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. त्या अडीच वर्षांत शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे सभापती होत्या. त्यानंतरच्या अडीच वर्षांसाठी सभापतिपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाले. तेव्हा ३१ डिसेंबर २०१९ रोजी प्रथमतः अंकुश राक्षे सभापती झाले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ३० सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या निवडणुकीत भगवान पोखरकर सभापती झाले होते. दोघेही कुणबी जातीच्या प्रमाणपत्रावर सभापती झाले होते. 

पंचायत समितीत चौदापैकी आठजण शिवसेनेचे सदस्य असल्याने त्यांचे बहुमत होते. शिवाय त्यांना कॉंग्रेसचे अमोल पवार व भाजपच्या चांगदेव शिवेकरांचाही पाठिंबा होता. शिवसेनेकडे सुभद्रा शिंदे या एकमेव अनुसूचित जमातीच्या सदस्य असल्याने पहिल्या अडीच वर्षांत काही समस्या नव्हती. अंकुश राक्षे सभापती झाले, तेव्हा शिवसेनेकडून अनेक इच्छुक होते. 
त्यावेळी शिवसेना नेत्यांनी व सदस्यांनी आपापसांत बसून पदांच्या कालावधीचे वाटप केले. त्यामुळे राक्षे बिनविरोध सभापती झाले. पण, तेव्हाही दोन-तीन सदस्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. पोखरकर सभापती होताना शिवसेनेचेच काही सदस्य विरोधात होते. खबरदारी म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांची मदत घेतली. प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या सुनीता सांडभोर व वैशाली जाधव विरोधात गेल्या होत्या. सांडभोरांनी तेव्हा उमेदवारी अर्जही भरला होता. त्यांना दोन व पोखरकरांना १२ मते पडली होती. 

आता बहुमत असलेल्या गटाकडे राष्ट्रवादीचे अरुण चौधरी आणि शिवसेनेच्या वैशाली जाधव व सुनीता सांडभोर हे इच्छुक आहेत. त्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत, त्यामुळे यापैकीच कुणीतरी सभापती होईल, अशी शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in