सारा त्रास सांगताना ज्योती देवरेंच्या डोळ्यात अश्रू
jyoti devare.jpg

सारा त्रास सांगताना ज्योती देवरेंच्या डोळ्यात अश्रू

राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे निवेदन देण्यासाठी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या चौकशी समोर बाजू मांडण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या.

अहमदनगर ः राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे निवेदन देण्यासाठी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या चौकशी समोर बाजू मांडण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. या वेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थित तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी हाताला काळी पट्टी बांधून देवरे यांच्या वरील दबावा बाबत निषेध व्यक्त केला. हा सर्व प्रकार संगताना देवरे यांना अश्रू अनावर झाले होते.

देवरे म्हणाल्या, आज चौकशी समिती समोर माझी सुनावणी आहे. त्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयात आली आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे आहे. या प्रकरणामध्ये राज्य पातळीवरून समिती गठीत होऊन यामध्ये योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

हेही वाचा...

ज्या पद्धतीने त्रास दिला अथवा देण्याचे काम सुरू आहे या बाबी मी समिती समोर मांडणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या बाबत सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी माझे समुपदेशन केले आहे. कोणत्याही त्रासाला न जुमानता आपले कर्तव्य करत रहायचे याचे मोलाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. त्यामुळे मी मला दिलेले काम करत आहे. मी संघटनेची जिल्हाध्यक्ष व राज्याची कार्याध्यक्ष असल्याने हे निवेदन देण्यासाठी आली आहे. आमच्या तहसीलदार, नायब तहसीलदार एकत्र जमलो आहोत.

क्लिप माझीच होती. पण ती व्हायरल केली नव्हती. माझ्या भावाने न राहून त्याच्या एका पत्रकार मित्राला दिली. अशा चुकीच्या पद्धतीने ती समाज माध्यमांत व्हायरल झाली. मात्र स्वतः व्हायरल केलेली नाही. त्यात मी कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र हा त्रास प्रातिनिधीक स्वरूपाचा आहे. अशा प्रकारच्या त्रासाला महिला अधिकाऱ्यांना सतत सामना करावा लागतो. एका क्षणाला माझे स्वतःवरील नियंत्रण संपले. मी नैराश्यात गेले. त्यावेळची ती माझी भावनिक क्लिप होती. त्यानंतर मी रडले. त्यानंतर मी स्वतःला सावरले. त्याच वेळी माझ्या मैत्रिणींनी माझा संपर्क राज्य महिला आयोगाच्या अनिता पाटील यांच्याशी करून दिला. अनिता पाटील यांनी माझे दिवसभर समुपदेशन केले. माझ्या व माझ्या पतीच्या संपर्कात राहिल्या. त्यामुळे दुर्दैवी प्रसंग कदाचित आला असता तो टळला. त्यानंतर मला लगेच जाणिव झाली की, अधिकारी यापेक्षा माझे कुटुंब महत्त्वाचे आहे असे वाटू लागले. त्या गोष्टी आठवल्या की मला त्रास होतो. त्या आठवल्या नाही तर मी माझे काम करत आहे. मी माझ्या कामाला सुरवात देखिल केली आहे.

क्लिप व्हायरल झाल्यानंतरचा जो त्रास वाढला आहे. तो त्याच्याहून दुप्पट आहे. मला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 10 ते 12 वेळा फोन केले होते. त्यांना मला भेटायचे होते. माझे फोन दोन दिवस बंद होते. माझी मनस्थिती नव्हती. मला राज्यभरातून फोन येत होते. फोन बंद होता व तो माझ्या आई कडे होता ही गोष्ट मला लक्षात आली नाही. जेव्हा मला ही गोष्ट कळाली तेव्ही मी अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी गेले. अण्णांनी माझ्यावर नाराजी व्यक्त केली. असा टोकाचा निर्णय घ्यायचा नसतो. तुकाराम मुंढे यांचा आदर्श घ्या. त्यांना की त्रास होतो. तुम्ही का डगमगता असा प्रश्न विचारला त्यावर माझ्याकडे उत्तर नव्हते. मी अण्णांना सांगितले, कदाचित एक महिला असल्याने सर्व बाजूनी अडचणीत आणण्याचे जे प्रयत्न झाले त्या मनस्थितीत दिपाली चव्हाण यांच्या मनस्थितीची जाणिव झाली. तशी मनस्थिती माझी झाली होती. वेळ आल्यावर आपली मनस्थिती कुंठीत होते. तुम्ही फक्त माझ्या पाठीवर हात ठेऊन लढ म्हणा मी लढेल. सत्य गोष्टी लोकांसमोर येतातच. महाघोटाळा केला आहे. तो दडपण्यासाठी मी हे केले असा खोट्या गोष्टी पसरविल्या जात आहेत. केवळ एक महिलेला खाली दाखविण्यासाठी सर्वजण एकत्र येऊ शकतात. 

हेही वाचा...

काही लोकांकडून चुकीच्या काही बातम्या माझ्या कानावर आल्या होत्या. की, तुमचे दोन तासातच निलंबण होणार आहे. काही कार्यकर्त्यांनी दोन तासात तुम्हाला पारनेरमधून तोंड काळे करावे लागणार आहे, असे सांगितले. त्यामुळे फ्रस्ट्रेशनमध्ये माझ्याकडून मनात नकारात्मक विचार आला. मी एक जबाबदार महिला अधिकारी आहे. मी जबाबदारीने सर्व जबाबदाऱ्या पार केल्या आहेत. कोविड काळात रात्री 2 ते 3 वाजता कधीही कर्तव्य बजावले घाबरले नव्हते. आताही घाबरणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा दहा मिनिटाचा नकारात्मक प्रसंग येऊ शकतो. त्यावर मी निश्चित मात केली. त्यानंतरही त्रास देण्याचे काम सुरूच आहे.

मी म्हटले होते सर्व मनूचे अनुयायी आहेत. यात कोठेही खोटे नाही. प्रसारमाध्यमात क्लिप गेल्यावर विरोधकांना मनाला पाझर फुटायला हवे होते. माझे भावनिक आव्हानात कोणाचेही नाव नव्हते. हा त्रास अतिरिक्त होतोय, असे त्यांनी समजून घ्यायला हवे होते. काहींनी आरोप-प्रत्यारोप केले. माझ्या पाठीमागून फोटो घेण्यात आले. महिला अधिकाऱ्याचे असे परवानगी न घेता फोटो घेणे अयोग्य आहे. अण्णा हजारे यांनी हकलून दिले अशा पोस्ट नको होत्या. या पोस्ट व बात्या ज्या घाईने प्रसारित केल्या त्याचे दुःख वाटले. म्हणून मी माझी बाजू मांडली. प्रसारमाध्यमे माझ्या बाजूने राहिली.

कदाचित मी भावनिक झाले मात्र यानंतर मी जिद्दीने माझे काम पुढे सुरू ठेवणार आहे. महिला अधिकाऱ्यांची मानसिक कुचंबना, अवहेलना करू नये याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले चांगले आहेत. त्यांनी मला समजून घेतले. अशा प्रसंगांकडे कसे दुर्लक्ष करावे व आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे, हे शिकविले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अनिता पाटील यांनी मला आत्महत्येपासून परावृत्त केले. महसूलमंत्र्यांनीही मार्गदर्शन केले. या प्रकारातून माझे मन पूर्वीसारखे कनखर होईल व मी नव्याने लढायला सज्ज होईल.

माझ्या मागे महसूल संघटना खंबीरपणे उभ्या आहेत. राज्यभर आंदोलने होत आहेत. राज्यातील अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क करून पाठिंबा दिला आहे. पारनेर तहसीलमधील कर्मचाऱ्यांवर सध्या दबाव आणला जात आहे. मॅडमला आम्ही हकलून देणार आहोत. तुम्ही इथेच राहणार आहात. तुम्ही त्यांच्या विरोधात उभे राहिले नाहीत तर आम्ही पाहून घेऊ, अशा प्रकारे सांगितले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेली चौकशी समिती स्थानिक आहे. त्यांच्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यस्तरीय समितीने चौकशी करावी, ही संघटनेची मागणी आहे. त्यामुळे राज्यस्तरीय महिला अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. मागणी लवकरच पूर्ण होईल. अॅड. नीलम गोऱ्हे या प्रकरणी प्रयत्नशील आहेत, असे तहसीलदार देवरे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.