लक्ष्मण ढोबळेंच्या आरोपाला सुशीलकुमार शिंदे यांनी दिले उत्तर...

त्यांना पक्षात कोणीच काही किंमत देत नाहीत.
लक्ष्मण ढोबळेंच्या आरोपाला सुशीलकुमार शिंदे यांनी दिले उत्तर...
Sushilkumar Shinde reply to Laxman Dhoble allegations

सोलापूर : मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंत्रिपदाला अडथळा होऊ नये म्हणून ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीच अक्कलकोटचे सिध्दाराम म्हेत्रे यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केले, असा खळबळजनक आरोप माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते लक्ष्मण ढोबळे यांनी केला होता. त्याबाबत बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी ‘त्यांना एवढी किंमत देण्याची गरज नाही,’ असा नामोल्लेख टाळून टोला लगावला. (Sushilkumar Shinde reply to Laxman Dhoble allegations ...)

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ढोबळे यांनी कॉंग्रेसवर विशेषत: सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यावर उत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांनी नामोल्लेख टाळत ढोबळेंच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचाच सल्ला दिला. 

लक्ष्मण ढोबळे यांची ताकद भाजपला माहिती आहे. त्यामुळे त्यांना पक्षात कोणीच काही किंमत देत नाहीत. त्यातूनच ते वारंवार अशा प्रकारची वक्‍तव्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी अशी बेताल वक्‍तव्य करण्यापेक्षा विकासकामांवर बोलावे आणि त्यांनी सोलापूर शहरात ढवळाढवळ करण्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला. 


कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना मुलाप्रमाणे मानतात. ज्या पक्षाने लक्ष्मण ढोबळेंना मोठे केले, त्या पक्षाला सोडून पक्षांतर करणाऱ्या ढोबळेंना लोक चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळेच त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडून शहराकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. चापुलसगिरी करणाऱ्या ढोबळेंना हे बोलणे शोभत नाही, असे कॉंग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले. 

निवडणुकीनंतर लक्ष्मण ढोबळेंनी आताच हे वक्‍तव्य का केले, हा संशोधनाचा भाग आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीच कोणाबद्दल द्वेष ठेवला नाही. शहराच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळेच दुहेरी पाईपलाईन होत असल्याचे ढोबळेंनी विसरू नये, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक ऍड. यु. एन. बेरिया यांनी सांगितले.

सोलापूर स्मार्ट सिटीत येण्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांचे योगदान सोलापुकरांना माहिती आहे. कॉंग्रेसने पहिलीच बैठक शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात घेतली. त्यामुळे भाजप नेत्यांच्या पायाखालील वाळू सरकरली आहे. कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी लक्ष्मण ढोबळे यांनी हे वक्‍तव्य केले आहे, असा टोला माजी महापौर संजय हेमगड्डी यांनी लगावला. 

काय म्हणाले होते लक्ष्मण ढोबळे?

आपला विरोधातील उमेदवार कोण असावा, हेही सुशीलकुमार शिंदे हेच ठरवत होते. आपल्या मुलीच्या मंत्रीपदाला अडथळा होऊ नये;म्हणून त्यांनी म्हेत्रे यांनाही निवडणुकीत पराभूत केले. तसेच, ताई तुम्ही एकदा शहर मध्य सोडून शहर उत्तरमध्ये निवडणूक लढवा.  एकदा होऊन जाऊद्याच, असे आव्हानही ढोबळे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना दिले.

तुम्ही फक्त वाढपी बदला 

स्मार्ट सिटीच्या कामात नुसता भ्रष्टाचार सुरु असून कंत्राटदारांना जोपासण्याचे काम भाजप सत्ताधाऱ्यांनी केले. सोलापूर शहराचे प्रश्‍न सोडविलेच नाहीत, अशी टिका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली होती. तसेच, घराघरांत नियमित पाणी देतो; म्हणून भाजप सत्तेवर आले, परंतु त्यांनी घराघरांत महागाई पोचवली. आम्ही पाणी आणून दाखवू, असेही त्या म्हणाल्या होत्या. त्यावर ढोबळे म्हणाले, ‘ताई आम्ही पाईपलाईन करून दाखवू, तुम्ही फक्त वाढपी बदला.’ आता तो वाढपी महापालिकेतील कॉंग्रेसचा नेता की स्मार्ट सिटीतील अधिकारी, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.