पुणे महानगर नियोजन समितीवर शेळके, जगताप, बारणे  

आता ते शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे आहे.
 Sunil Shelke, Sanjay Jagtap, Shrirang Barne selected on Pune Metropolitan Planning Committee
Sunil Shelke, Sanjay Jagtap, Shrirang Barne selected on Pune Metropolitan Planning Committee

पिंपरी  ः  मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांची पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य, तर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची विशेष निमंत्रित म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. ता. २७ जून रोजी कार्यकाल संपलेली ही समिती नुकतीच पुनर्गठित करण्यात आली आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये या समितीवर भाजपचे वर्चस्व होते. आता ते शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे आहे. पुणे जिल्ह्याबाहेरील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांड्याचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची या समितीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक झाल्याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे. (Sunil Shelke, Sanjay Jagtap, Shrirang Barne selected on Pune Metropolitan Planning Committee)

शेळके यांच्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप यांचीही सदस्य म्हणून या समितीवर नियुक्ती झाली आहे. जिल्ह्यातीलच बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भोरचे कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांचा बारणे व सावंत यांच्याप्रमाणे समितीच्या विशेष निमंत्रितात समावेश आहे. पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

समितीवरील नियुक्तीबद्दल पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासदार बारणे यांनी आभार मानले आहेत. समितीच्या माध्यमातून मावळसह पिंपरी-चिंचवड शहरातील विकास कामांसाठी प्राधान्य देणार असून समतोल, सर्वंकष विकासासाठी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, याद्वारे पुणे जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन आणि प्रारुप आराखडा केला जाईल, असेही ते म्हणाले. या नेमणुकीबद्दल आमदार शेळके यांचा शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आज सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पिंपरी महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे उपस्थित होते.

समितीच्या ४५ सदस्यांपैकी ३० जण निवडून येतात. पण, सध्या कोरोनामुळे ही निवडणूक शक्य नसल्याने सरकारी १२ नामनिर्देशित, तर दोन पदसिद्धसदस्यांसह अध्यक्षांची नियुक्ती पाच वर्षासाठी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अध्यक्ष आणि पुणे विभागीय आयुक्त व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांची पदसिद्ध सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, आळंदी, तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे सदस्य आहेत. नुकतेच पीएमआरडीए आणि पिंपरी पालिकेत विलिनीकरण झालेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना सुद्धा या समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आले आहे, हे विशेष. याबाबतची अधिसूचना नुकतीच काढण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in