गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; राष्ट्रपती राजवटीची मागणी... - statue of home minister was burnt  | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; राष्ट्रपती राजवटीची मागणी...

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 मार्च 2021

भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले गेले. महाविकास आघाडी सरकारचा ढोल वाजवत निषेध करण्यात आला. बारामतीतील भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत जोरदार घोषणा दिल्या.

बारामती:  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर बारामतीत रविवारी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून अनिल देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले गेले. महाविकास आघाडी सरकारचा यावेळी ढोल वाजवत निषेध करण्यात आला. बारामतीतील भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत जोरदार घोषणा दिल्या. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री खंडणीखोर असल्याचा आरोप करण्यात आला. देशमुख यांच्याबाबत निषेधाच्या घोषणा देत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, बारामती शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देणे, संपूर्ण कर्जमाफी न करणे, नियमित कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा न करणे, कोविड काळातील वीज बिल माफ न करता कारवाई करत वीज तोडणे, शेतकऱ्यांची वीज कापल्याने अनेकांना वणवण करावी लागत आहे,  याचा निषेध करणारे सरकारच्या विरोधातील निवेदन देण्यात आले. 

दरम्यान, बारामती शहरातील नीरा डावा कालव्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण थांबविण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. यामुळे पाझर बंद होऊन विहिरी व विंधनविहिरी आटतील. त्यामुळे उन्हाळ्यात बारामतीकरांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागेल, असा आरोप करण्यात आला. भाजपचे शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व  कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख