अॅड. नितीन लांडगेंसह पाच जणांना 'या' अटीवर जामीन मंजूर

पुणे येथील विशेष न्यायालयात अॅड. लांडगेंसह या गुन्ह्यातील सर्व आरोपींच्या जामिनावरील युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला होता.
अॅड. नितीन लांडगेंसह पाच जणांना 'या' अटीवर जामीन मंजूर
Adv. Nitin Landage .jpg

पिंपरी : लाचखोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे (BJP) स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे (Nitin Landage) यांच्यासह पाच जणांना न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. लांडगे यांच्या जामिनावरील निर्णय न्यायालयाने शनिवारी राखून ठेवला होता. आज (ता. ३० ऑगस्ट) न्यायालयाने पाच जणांना जामीन मंजूर केला. (Standing Committee Chairman Nitin Landage granted bail)  

नितीन लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे, शिपाई अरविंद कांबळे, संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि लिपिक विजय चावरिया यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी लाचलुचपत विभााच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान हजेरी. तसेच फिर्यादी आणि गुन्ह्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येण्याच्या अटीवर व तसेच प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. नितीन लांडगे यांच्यातर्फे अॅड. प्रताप परदेशी आणि अॅड. गोरक्षनाथ काळे यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

दरम्यान, पुणे येथील विशेष न्यायालयात अॅड. लांडगेंसह या गुन्ह्यातील सर्व आरोपींच्या जामिनावरील युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला होता. सर्व पाच जणांच्या जामिनास सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी जोरदार विरोध केला होता. स्थायीतील सर्वांनी मिळून हा गुन्हा केला असल्याने त्या सर्वांची चौकशी करायची आहे. या गुन्ह्यात अटक झालेले स्थायी समितीचे सभापती अॅड. नितीन लांडगे यांचे पीए तथा स्थायीचे मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळेने टक्केवारी द्यावी लागत असलेले ते १६ जण म्हणजे स्थायी सदस्य असल्याचे सांगितले आहे. 

त्यामुळे त्यांच्याकडे व स्थायीतील इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करावी लागणार आहे. एकूणच तपास प्राथमिक टप्यावर असून तो पूर्ण झालेला नाही. त्यासाठी तपासाधिकाऱ्यांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे, त्यामुळे आरोपींना या टप्यावर जामीन दिला, तर फिर्यादीसह साक्षीदारांवर दबावही येईल. तसेच, या कटात सामील असलेले इतर संभाव्य आरोपी फरार होतील, असा युक्तिवाद अॅड. घोरपडे यांनी केला होता.

तपास पूर्ण झाला असून लाचेची रक्कमही जप्त करण्यात आली असल्याने आरोपींच्या कोठडीची अथवा त्यांना तुरुंगात ठेवण्याची गरज नाही, असे आरोपी लांडगे यांचे वकील अॅड. प्रताप परदेशी यांनी सांगत आरोपींना जामीन देण्याची विनंती केली होती. त्यासाठी न्यायालयाने टाकलेल्या अटी, शर्तींचेही पालन केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर विशेष न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी या प्रकरणाचा निकाल सोमवारपर्यंत राखून ठेवला होता. त्यानंतर आज न्यायालयाने निकाल दिला. त्यामध्ये या पाचही जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.   

Related Stories

No stories found.