जगतापांची बाजार समिती, पाटलांची आमदारकी घालविणाऱ्या बंडगरांची बंडखोरी पुन्हा चर्चेत 

मध्यंतरी माजी आमदार नारायण पाटील यांनी बंडगर यांचा आमच्याशी काही संबंध नसल्याचे जाहीरपणे सांगितले. पण, ते सांगण्यास त्यांना खूप उशीर झाला.
जगतापांची बाजार समिती, पाटलांची आमदारकी घालविणाऱ्या बंडगरांची बंडखोरी पुन्हा चर्चेत 
Shivaji Bandagar's rebellion is under discussion again

करमाळा (जि. सोलापूर) : गेली तीन वर्षांपासून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोवतीच तालुक्याचे राजकारण गुरफटल्याचे दिसत आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी 2018 मध्ये माजी आमदार नारायण पाटील यांचे विश्वासू बाजार समितीचे संचालक शिवाजी बंडगर यांनी बंडखोरी करून बागल गटात प्रवेश केला आणि थेट सभापतीची खुर्ची मिळवली. पण, आजही शिवाजी बंडगर यांच्या बंडखोरी भोवतीच करमाळा तालुक्याचे राजकारण फिरत असल्याचे दिसते. (Shivaji Bandagar's rebellion is under discussion again)

गेली तीन वर्षात तालुक्यातील कोणतीही निवडणूक आली की या प्रत्येक निवडणुकीला बंडगर यांची बंडखोरीच चर्चेचा विषय असते. विशेष म्हणजे या घटनेपासून कोणत्या गटाचा आमुक कार्यकर्ता फुट शकत नाही, असे जर कोण बोलले तर जिथे बंडगर फुटू शकतात, तिथे कोणावर विश्वास कसा ठेवायचा? अशी सहज प्रतिक्रिया येते. एकुणच करमाळा तालुक्याच्या राजकारणात बाजार समितीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व दिले जात आहे. बाजार समितीच्या सुधारणेसाठी, शेतकरीहिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा जगताप गट व बागल गट हे सत्तेसाठी प्रत्येक वेळी संघर्ष करत असल्याची चर्चा आहे. 2018 पासून संचालक मंडळाची एकही सभा बिना वादाची पार पडलेली नाही.

येत्या ऑक्टोबरमध्ये बंडगर यांच्या बंडखोरीला तीन वर्षे पूर्ण होतील, तरीदेखील बंडगर यांनी केलेली बंडखोरी आणि या बंडखोरीने बाजार समितीत वाढलेला कलह आजही कमी झालेला नाही, उलटपक्षी तो वाढतच गेला आहे. बंडगर यांच्या बंडखोरीने जगताप गटाची अनेक वर्षांची बाजार समितीवरील सत्ता गेली. त्या वेळी झालेल्या वादातून जगताप व त्यांच्या मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यामुळे अनेक महिने जगताप यांना फरारी राहावे लागले होते. त्यामुळे चिडलेल्या जगतापांनी विधानसभेला आमदार संजय शिंदे यांना सहकार्य केले. त्यातून संजय शिंदे यांचा आमदारकीचा मार्ग सुखकर झाला, तर नारायण पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. बंडगर यांच्या बंडखोरीचा ठपका ठेवत जगताप यांनी नारायण पाटील यांना आमदारकीच्या निवडणुकीत कडाडून विरोध केला. मध्यंतरी माजी आमदार नारायण पाटील यांनी बंडगर यांचा आमच्याशी काही संबंध नसल्याचे जाहीरपणे सांगितले. पण, ते  सांगण्यास त्यांना खूप उशीर झाला. 

सध्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव निवडीवरून सुरू झालेला वाद अजूनही मिटलेला नाही. यात बागल गट व जगताप गट यांच्यात मोठी चढाओढ सुरू आहे. सावंत गटाने या प्रकरणात जगताप यांना विरोध करत बागल गटाला साथ दिली आहे. याचा परिणाम येत्या नगरपरिषद निवडणुकीवरही होऊ शकतो. सचिव निवडीच्या सुनावणी पणन संचालकांकडे सुरू आहे, त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांचे पगारही थांबले आहेत.

सध्या माजी आमदार जयवंतराव जगताप, बाजार समितीचे संचालक, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, उपसभापती चिंतामणी जगताप यांच्या संचालकपदाविरोधातदेखील सुनावणी पणन संचालकांकडे सुरू आहे. मागील आठवड्यात तर बाजार समितीच्या चार सुनावणीच्या सलग तारखा पणन संचालकांकडे होत्या. त्यामुळे सध्या बाजार समितीच्या राजकारणाला कमालीचे महत्त्व आले आहे. 

संचालकपद वाचवण्यासाठी आणि आपल्याच गटाचा सचिव बसावा, यासाठी जगताप गट व बागल गट यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक मोठा असतानादेखील सध्या बाजार समितीत घटत चाललेली शेतीमालाची आवक, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही. केवळ सत्तेसाठी आणि पदासाठी चाललेली धडपड तालुक्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in