त्या मला रात्री-अपरात्री मेसेज पाठवून म्हणत होत्या... - नीलेश लंके

आमदार नीलेश लंके यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावरगंभीर स्वरूपाचे आरोप करणारा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
त्या मला रात्री-अपरात्री मेसेज पाठवून म्हणत होत्या... - नीलेश लंके
Nilesh Lanke1.jpg

नगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका आँडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा तेथील आमदार नीलेश लंके यांच्यावर असल्याचे त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगातून दिसून येते. त्यामुळे आमदार नीलेश लंके यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करणारा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

या व्हिडिओमध्ये लंके म्हणतात की, तहसीलदार ज्योती देवरे यांची दोन दिवसांपासून क्लिप व्हायरल होत आहे. त्यांनी केलेला हा केविलवाणा प्रयोग आहे. त्यांच्यावर काही गंभीर स्वरुपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी मुंबईला पाठविला आहे. या आधीही त्यांनी असेच बरेच प्रयोग केले आहेत. मलाही वैयक्तिक स्वरुपात काम करताना त्यांचा भ्रष्टाचार दिसून आला. त्यावेळी मी त्यांना सुचित करण्याचा प्रयत्न केला होता. त्या-त्या वेळी त्यांनी रात्री-अपरात्री मॅसेज पाठवून जर तुम्ही या गोष्टी उघड केल्या तर मी आत्महत्या करेल असे आत्तापर्यंत बरेच प्रकार झाले आहेत. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कारभारात दोषी धरतात. निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना दोषी धरतात. त्याच केवळ चांगले काम करतात असे त्या दाखवत असतात.

त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्याची चौकशी सु्द्धा चालू आहे. हा बचाव करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयोग आहे, असे आमदार लंके यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या स्पष्टीकरणाने पारनेर तालुक्यात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. 

आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवरे यांनी पत्र लिहिलं आहे. मी लवकरच तुझ्या सोबत येत असल्याचे सांगत महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो. लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात. आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचा उल्लेख त्यांनी केला आहे. कोवीड लसीकरणावरुन आमदार निलेश लंके यांनी एका आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. याचा उल्लेखही देवरे यांनी लंके यांचे नाव न घेता केला आहे.

आपल्या विरुद्ध विधीमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीच्या चालकाकडून लिहून घेणं, अँट्रोसिटीची तक्रार दाखल करण्याची धमकी देणे असे अनेक प्रकार घडल्याने देवरे यांनी क्लिपमध्ये नमूद केले आहे. आपल्या मुलांकडे पाहून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलण्याचा विचार कधीकधी येतो. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हे पाऊल उचल्याचे देवरे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.