जेव्हा शरद पवार आग्र्यात मराठमोळ्या अधिकाऱ्याला भेटतात... - Sharad Pawar meets a Marathi youth in Agra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

जेव्हा शरद पवार आग्र्यात मराठमोळ्या अधिकाऱ्याला भेटतात...

सुदाम बिडकर
रविवार, 21 मार्च 2021

एका मराठमोळ्या अधिकाऱ्याला चक्क शरद पवार स्वतः भेटले व त्याची विचारपूस करत शाबासकीची थापही त्यांनी दिली, तेही आग्र्यात. स्वप्नवत वाटत असणारी ही गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे.

पारगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यासारख्या मुत्सद्दी व ज्येष्ठ राजकारण्याला भेटण्याची इच्छा अनेक जण व्यक्त करतात. अनेकांची ही इच्छा पूर्ण होते, मात्र बहुतांश जणांची ही इच्छा स्वप्नच राहते. परंतु, एका मराठमोळ्या तरुणाला चक्क शरद पवार स्वतः भेटले व त्याची विचारपूस करत शाबासकीची थापही त्यांनी दिली, तेही आग्र्यात. स्वप्नवत वाटत असणारी ही गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे.

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील रोहन प्रमोद बोत्रे (आयपीएस ) या मराठी अधिकाऱ्याने उत्तरप्रदेशातील आग्रा शहराच्या पोलिस अधिक्षक पदावर कार्यरत असताना आपल्या कर्तत्वाचा ठसा उमटवून आग्रा शहरातील गुन्हेगारी क्षेत्रावर वचक निर्माण केला. विशेष बाब म्हणजे त्यांचे कर्तुत्व शरद पवार यांच्यापासून लपून राहिलेले नाही. 

पवारांबरोबरच खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटुंबीय आग्रा शहराच्या सदिच्छा भेटीवर असताना मूळचे पुण्याचे असलेले व सध्या आग्रा शहराचे पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत असलेले रोहन बोत्रे यांची पवार यांनी आवर्जून भेट घेतली. आस्थेवाईकपणे कौटुंबिक वातावरणात त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची माहिती घेत त्यांच्या कामाचे कौतुकही केले. पवार व सुळे कुटुंबासह आग्रा शहराच्या सदिच्छा भेटीवर असताना त्यांना स्थानिक लोकसभा सदस्याकडून माहिती मिळाली. आग्रा शहराचे पोलिस अधिक्षक हे तुमच्या महाराष्ट्रातील आहेत, हे कळल्यानंतर पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता बोत्रेंची भेट घेतली. 

अवसरी खुर्द हे रोहन बोत्रे यांचे मूळ गाव असून बोत्रे यांचे लहानपण गावी अवसरी खुर्द येथेच गेले. आई-वडील रयत शिक्षण संस्थेच्या पुण्यातील हडपसर येथील एस एम जोशी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून सेवा करीत होते. ही माहिती पवार यांना बोत्रेंच्या भेटीदरम्यान कळल्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष या नात्याने त्यांना आनंद झाला व तसे त्यांनी बोलूनही दाखविले. महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणार्‍या कुटुंबाचा व रयत शिक्षण संस्थेच्या परिवारातील रोहन बोत्रे हे आग्रा शहराचे एसपी म्हणून सध्या अत्यंत कर्तबगारीने काम करीत आहेत, याबद्दल विशेष आनंद पवार यांनी आपल्या भाष्यातूनही व्यक्त केला. 

बोत्रे यांनी पुणे आणि अमेरिकेत शिक्षण घेऊन भारतात आयपीएसपदी काम करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर सद्यःस्थितीत उत्तर प्रदेशमधील असलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात रोहन बोत्रे यांच्या प्रत्यक्ष कामातील अनुभव देखील जाणून घेतले. उत्तर प्रदेशातील पोलिस प्रशासनात नव्याने राबवल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती देखील बोत्रे यांच्याकडून पवार यांनी जाणून घेतली. दरम्यान, बोत्रे यांनी त्यांचे प्रत्यक्ष कामातील काही अनुभव या भेटीत कथन केले . अत्यंत कर्तबगारीने उत्तर प्रदेशमध्ये बोत्रे यांनी नाव कमावले, याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त करून भविष्यकाळातील कारकिर्दीबाबत त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्याचबरोबर नवी दिल्ली येथील घरी येण्याचे निमंत्रण देखील पवार यांनी बोत्रे यांना दिले. 

पवारांची फेसबुक पेजवर पोस्ट:
शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी आग्रा भेटीदरम्यान रोहन बोत्रे यांच्या भेटीची माहिती छायाचित्रासह आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. डिसेंबर 2005 मध्ये आग्रा येथील इंडियन ओवरसीज बँकेवर दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींपैकी फरारी आरोपीला चकमकीत हाफ एन्काउंटर करून अटक करण्यात रोहन बोत्रे व त्यांच्या टीमला यश आले. तसेच ऑगस्ट 2020 मध्ये आग्रा येथे चांदीच्या व्यापाऱ्याची दहा किलो चांदी लुटणाऱ्या दरोडेखोरांबरोबर पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका दरोडेखोराचा हाफ एन्काउंटर करण्यात आला आणि नऊ दरोडेखोरांना अटक करण्यात रोहन बोत्रे व त्यांच्या पथकाला यश आले. याबाबत बोत्रे यांना गौरविण्यात देखील आले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख