उद्धव ठाकरे किती वर्षे मुख्यमंत्री राहणार? : शरद पवारांनी राऊतांना सांगितला कालावधी

महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीबाबत नेहमीच चर्चा!
raut-pawar-uddhav.
raut-pawar-uddhav.

मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी गेल्या पंधरा दिवसांत तीन वेळा झालेल्या बैठका, शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मोदी विरोधकांची झालेली बैठक आणि या बैठकीला शिवसेनेला नसलेले निमंत्रण यावरून राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे महाविकास आघाडी सरकार राहणार की जाणार? (Sharad Pawar clarifires about tenure of Uddhav Thackeray as CM)

एकीकडे या नियोजित घडामोडी सुरू असताना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घ्या, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या सल्ल्याने राजकीय बाॅम्बगोळा पडला. शिवसेना आणि भाजप यांचे काही जुळते आहे, अशी भाकीते वर्तविण्यात येऊ लागली. या साऱ्या प्रकारावर आता खुद्द शरद पवार यांनीच महाविकास आघाडीतील विश्वासू माणसाकडे म्हणजे खासदार संजय राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण दिले आहे.

दिल्लीतील दोन दिवसांच्या घडामोडी आटोपून शरद पवार हे आज सायंकाळी मुंबईत पोहोचले. तेथे संजय राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याबाबतची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली. ``शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात  शंका दिसत नाही.  उद्धव ठाकरे पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत, असे श्री.पवार म्हणाले,``असे राऊत यांनी सांगितले.

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हे अडीच वर्षांचे मुख्यमंत्री असल्याची शंका होती. मात्र ठाकरे हे पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करतील, असे राऊतांनी शरद पवार यांच्याकडून स्पष्ट करून घेतल्याचे या ट्विटमधून दिसून येत आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींचा दुसराही अर्थ काढण्यात येत होता. तो म्हणजे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिवसेनेवर मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी आतापासूनच दबाव आणत असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या भाषणात स्वबळ हा आमचाही हक्क असल्याचे सांगत कोणाची पालखी वाहणार नसल्याचे वक्तव्य केले. त्यातून ठाकरे देखील दोन्ही काॅंग्रेसला इशारा देत असल्याचे विश्लेषण करण्यात आले होते. या साऱ्या शंका पवार आणि राऊत यांच्यातील संभाषणामुळे दूर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

त्यामुळे गेले काही दिवस सुरू असलेला राजकीय धुरळा शांत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीतील सरकारच्या सूत्रानुसार महामंडळाचे वाटपही करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार साई संस्थान हे राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे आणि पंढरपूरचे संस्थान हे काॅंग्रेसकडे जाण्याची चिन्हे आहेत. विधीमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णयही सरकारने घेतला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून मंत्रीमंडळ बैठकीत वाद होतील, असा अंदाज व्यक्त होत असतानाच आजची मंत्रीमंडळ बैठकही सुरळीत पार पडली.

दुसरीकडे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यांनीही स्वबळाची भाषा बोलण्याचा आपला दिनक्रम कायम ठेवला. मात्र पाच वर्षे आम्ही महाविकास आघाडीत राहू, असेही दुसरीकडे स्पष्ट केले.  या साऱ्य बाबींमुळे आणि राऊत यांच्या ट्विटमुळे उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in