मुश्रीफ-मंडलिक गटातील वाद टोकाला : उपसरपंचासह सात गावकारभाऱ्यांचे एकाच दिवशी राजीनामे

शेवटच्या वर्षी काहीतरी गोंधळ होण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.
मुश्रीफ-मंडलिक गटातील वाद टोकाला : उपसरपंचासह सात गावकारभाऱ्यांचे एकाच दिवशी राजीनामे
Seven Gram Panchayat members including Deputy SarPanch resign on the same day

कसबा सांगाव (जि. कोल्हापूर) : कसबा सांगाव येथील उपसरपंच विक्रमसिंह जाधव यांच्यासह सात ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत राजीनामे दिले. मंडलिक गटाचे विक्रमसिंह जाधव, वीरश्री जाधव, रंजना माळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुल हेरवाडे, दीपक हेगडे, सारिका मगदूम आणि भाजपच्या पद्मावती जाधव यांनी सरपंच रणजित कांबळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले. यामुळे सत्ताधारी मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक गटातील अंतर्गत धुसफूस बाहेर आली. (Seven Gram Panchayat members including Deputy SarPanch resign on the same day)

गेल्या निवडणुकीनंतर मुश्रीफ गट ७, मंडलिक गट ४, शेतकरी संघटना ४, शिवसेना १, भाजप १ असे संख्याबळ होते. लोकनियुक्त सरपंच आणि सतरा सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत मंत्री मुश्रीफ आणि मंडलिक गटाची सत्ता होती. चार वर्षांत इतिवृत्त वेळेवर न लिहिणे, त्यामध्ये परस्पर फेरफार करणे, आक्षेप न नोंदवणे, चौदाव्या वित्त आयोगाच्या खर्चाचे वाचन मासिक सभेत न करणे, मागितलेली माहिती न देणे या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

सकाळी अकराच्या सुमारास चावडी चौक परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, उपनिरीक्षक प्रीतम पुजारी, आर. आर. पाटील यांनी बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील काही सदस्यांनी सरपंच रणजित कांबळे यांना साथ दिल्याचे स्पष्ट झाले. ग्रामसेवक शिवाजी कांबळे, पोलिस पाटील छाया हेगडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, नमुना आठ कर आकारणी पत्रकातील मिळकत क्रमांक २३१० मध्ये फेरफार केली आहे. मासिक सभेचा मंजुरीचा ठराव नसताना बोगस नोंदी केल्या आहेत. संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंच विक्रमसिंह जाधव आणि सहा सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, ग्रामविकासमंत्री, पालकमंत्री यांना दिल्या आहेत.

शेवटचे वर्षे आणि गोंधळाचे नाते

निवडणुकीनंतर सुरवातीला चार वर्षांत धुसफूस असते. मात्र शेवटच्या वर्षी काहीतरी गोंधळ होतोच. फोडाफोडीचे राजकारण, अविश्वास ठराव, राजीनामे या कारणास्तव येथील ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत आहे. शेवटच्या वर्षी काहीतरी गोंधळ होण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.

मनमानीला कंटाळलो : उपसरपंच

कारभार स्वच्छ व्हावा एवढीच मागणी होती. विकासकामांना आमचा कधीही विरोध नव्हता. मागील दोन वर्षांत अनेकवेळा आक्षेप नोंदवला. मात्र, त्याची दखल घेतली नाही. मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा देत आहोत, असे उपसरपंच विक्रमसिंह जाधव तसेच स्वाभिमानीचे राहुल हेरवाडे यांनी सांगितले.

आरोप चुकीचे : सरपंच

अचानक राजीनामा आला. वरिष्ठांशी याबाबत चर्चा करू. कारभाराबाबत केलेले आरोप चुकीचे आहेत. दोन दिवसांत आपण याबाबत भूमिका स्पष्ट करणार आहोत, असे सरपंच रणजित कांबळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in