अजित पवार स्टाइलने माजी आमदार पाटसकरांच्या घराच्या जागेबाबत आदेश

राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे गेली ३० वर्ष घराचा प्रश्न रेंगाळला आहे.
अजित पवार स्टाइलने माजी आमदार पाटसकरांच्या घराच्या जागेबाबत आदेश
Send the proposal of former MLA Pataskar's house's for Land to the Ministry within eight days

केडगाव (जि. पुणे) : दौंडचे स्वातंत्र्य सैनिक व दिवंगत आमदार जगन्नाथ पाटसकर यांच्या घराच्या विलंबासाठी सर्वच राजकारणी जबाबदार आहोत. पण आता हा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटसकर यांचे चिरंजीव हरिभाऊ पाटसकर यांना आज (ता. २४ जुलै) दिली. (Send the proposal of former MLA Pataskar's house's for Land to the Ministry within eight days : Ajit pawar)

दौंडमध्ये एसटी स्थानक व ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न सुमारे दहा वर्ष प्रलंबित होता. काँग्रेसचे आमदार पाटसकर यांनी एसटी स्टँडसाठी १९८२ च्या दरम्यान उपोषण केले होते. त्यानंतर एसटी स्टँड मंजूर झाले; परंतू जागेअभावी ते पूर्णत्वास येत नव्हते. आमदार पाटसकर हे स्वतः भाड्याच्या घरात राहत असताना त्यांना स्वातंत्र सैनिक म्हणून मिळालेली दौंड शहरालगतची साडेसात एकर जमीन दौंड एसटी स्टँड व ग्रामीण रूग्णालयासाठी १९९१ मध्ये सरकारी भावात दिली. त्याबदल्यात सरकारच्या वतीने पाटसकर यांना दौंडमध्ये जागा व घर बांधून द्यायचे होते. तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते १९९२ मध्ये पाटसकर यांच्या घराचे भूमिपूजन झाले होते. भूमिपूजनानंतरच्या काही दिवसात तांत्रिक अडचणी सांगत ही जागा पाटसकर यांना नाकारण्यात आली. सरकारी अनास्थेमुळे व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे गेली ३० वर्ष घराचा प्रश्न रेंगाळला आहे. या विषयाला ‘सरकारनामा’ने वाचा फोडल्याने हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेला आला.

दौंड येथे मंगळवारी (ता. २० जुलै) पाटसकरप्रेमींची सहविचार बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दूरध्वनीवरून पाटसकर यांच्या घराची परवड सांगितली. पवार यांनी लगेच जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना फोन लावत या प्रकरणात लक्ष घालायला सांगितले. पवार यांनी जागेशी संबंधित सर्व कागदपत्रे मागवून घेत आज (ता. २४ जुलै) पुणे विधानभवन येथे बैठक आयोजित केली होती. या वेळी पवार यांनी या प्रकरणात खूप वेळ गेल्याने खंत व्यक्त केली. पवार यांनी कागदपत्रे व जागेचा नकाशाचीही तपासणी केली.

या वेळी पवार हे जिल्हाधिकारी देशमुख यांना उद्देशून म्हणाले की, पाटसकर यांच्या जागेबाबतचा सकारात्मक व कोणतीही तांत्रिक त्रुटी नसलेला प्रस्ताव येत्या आठ दिवसांत मंत्रालयात सादर झाला पाहिजे. पाटसकर यांच्या घराच्या विलंबाला सर्वच राजकारणी जबाबदार आहेत. घरासाठी जागा द्यायचे ठरले म्हटल्यावर त्यात कुठलीही तांत्रिक अडचण येता कामा नये. जागेच्या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे वैशाली नागवडे या पाठपुरावा करतील, असेही पवार यांनी नमूद केले. 

पाटसकर यांच्या कुटुंबातील व्यक्ती व त्यांच्या नोकरी व्यवसायाबद्दल पवार यांनी आस्तेवाईकपणे चौकशी केली. यावेळी आमदार राहुल कुल यांनीही मी स्वतः जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. कुल म्हणाले, पाटसकर यांच्या जागेचा विषय गेल्या आठ दहा वर्षांत चर्चेत आला नाही. अन्यथा यावर मागेच निर्णय झाला असता. ‘सरकारनामा’ने या विषयाची कोंडी फोडल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले.

या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे, भाजपचे अॅड. प्रशांत गिरमकर, शिवसेनेचे तुषार सोनवणे, सचिन गडधे, प्रदीप पाटसकर, सागर पाटसकर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.