कोरोनाचा उद्रेक; पुढील 100 दिवस महत्त्वाचे... - The second wave of corona will be in the peak in April and May, SBI reports | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाचा उद्रेक; पुढील 100 दिवस महत्त्वाचे...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 25 मार्च 2021

कोरोनाची दुसरी लाट जवळपास 100 दिवस भारतात राहणार असून पुढील 100 दिवस सर्वांसाठीच अतिमहत्त्वाचे राहणार आहेत. मे अखेरपर्यंत कोरोनाच्या या महालाटेचा परिणाम पाहायला मिळू शकतो, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या अहवालात नमूद केले आहे.  

मुंबई: गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा उद्रेक चांगलाच वाढल्याचे दिसून येते. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ही रुग्णवाढ पाहता देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला. कोरोनाची दुसरी लाट जवळपास 100 दिवस भारतात राहणार असून पुढील 100 दिवस सर्वांसाठीच अतिमहत्त्वाचे राहणार आहेत. मे अखेरपर्यंत कोरोनाच्या या महालाटेचा परिणाम पाहायला मिळू शकतो.  एप्रिल- मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट जोरदार असणार आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले. 

23 मार्चच्या कोरोना ट्रेन्डचा विचार करायचा झाल्यास देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 25 लाखापेक्षा अधिक लोक कोरोनाग्रस्त होऊ शकतात. एसबीआयकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या 28 पानी अहवालानुसार, स्थानिक पातळीवर लॉकडाऊनसारख्या निर्बंधांचा कुठलाही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे लसीकरणावर भर आणि त्याचा वेग वाढवणे नितांत गरजेचे असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले. पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसह अधिक वृद्धांची संख्या असलेल्या राज्यांनी आपल्या लोकसंख्येच्या कमी प्रमाणात लसीकरण केले आहे.  पुढील शंभर दिवस सर्वांनीच सावधानगिरी बाळगण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, मुंबईत बुधवारी (ता.24) तब्बल 5 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. तर, 2088 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आलंय. मुंबईत कोरोनामुळे 6 रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार मुंबईत कोरोनारुग्ण बरे होण्याचे दर 90 टक्के आहे. 17 ते 23 मार्चदरम्यान कोरोनारुग्ण वाढीचा दर 0.79 टक्के आहे, कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा डबलिंग रेट 84 दिवसांवर आलाय तर 39 अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले. 432 इमारती सील करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. 

महापालिकेच्या माहितीनुसार, वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा अॅलर्टवर आहेत. मुंबईत 8851 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. आयसीयू बेड्स 1559 तर 978 व्हॅन्टिलेटर बेड्स उपलब्ध आहेत, असे सांगण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार सातत्याने वाढत आहे. स्थानिक पातळीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आता या अहवालामुळे सर्वांचेच धाबे दणाणणार असून पुढील दोन-तीन महिने तरी कोरोनाचा आलेख चढताच राहील, असे स्पष्टपणे दिसून येते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख