संजयकाकांनी मला मठात नेले आणि मी केंद्रात मंत्री झालो

त्यापेक्षा मोठ्या पदाचा रस्ताही मठातूनच जातो
संजयकाकांनी मला मठात नेले आणि मी केंद्रात मंत्री झालो
MP Sanjay Patil took me to the Math and I became a Minister at the Center: Kapil Patil

सांगली : योगी आदित्यनाथ यांना खासदार संजयकाका पाटील यांनी किल्ले मच्छिंद्रगडच्या मठात नेले आणि पुढे योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. संजयकाकांनीही मला त्याच मठात नेले आणि मी केंद्रात मंत्री झालो. आता खासदार संजयकाका पाटील यांनाही कुणीतरी त्या मठात न्यावे, म्हणजे त्यांना मंत्री होण्याचा योग येईल, असा सल्ला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज दिला. (MP Sanjay Patil took me to the Math and I became a Minister at the Center: Kapil Patil)

सिनेअभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांच्या ट्रस्टतर्फे सांगली जिल्ह्यातील एक हजार मुलीचे सामुदायिक विवाह आणि एक हजार मुलींच्या नावे सुकन्या सहाय्य योजनेच्या माध्यमातून ५० हजारांची ठेव ठेवण्यात आली आहे. त्यात पाच मुलींना राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते ठेव पावती वाटप करण्यात आली. त्या कार्यक्रमात कपिल पाटील यांनी वरील सल्ला दिला. 

कार्यक्रमास केंद्रीय मंत्री पाटील यांच्यासह जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष दौलत शितोळे, अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधिक्षक दिक्षीत गेडाम, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, संजय बजाज, छाया पाटील आदी उपस्थित होते. या सामाजिक कामाबद्दल राज्यपाल कोशियारी यांच्या हस्ते सय्यद यांचा सत्कार करण्यात आला.

कपिल पाटील म्हणाले की, काही वर्षांपूर्वी योगी आदित्यनाथ आमदार व्हायच्या आधी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी खासदार संजय पाटील यांनी त्यांना किल्ले मच्छिंद्रगडच्या मठात नेले होते. स्वतः कपील पाटील यांनाही खासदार तेथे घेऊन गेले होते. या दोघांचे नशीब सध्या जोरात आहे. संजय पाटील खासदार आहेत. मात्र, त्यापेक्षा मोठ्या पदाचा रस्ता मठातूनच जातो, असा सल्ला कपिल पाटील यांनी त्यांना दिला.

‘‘पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पाऊस, महापुरामुळे संकट आले. अतिवृष्टी, महापुराने शेकडो घरे उद्ध्वस्त झाली. घरे पडलेल्यांना ९५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून घर बांधणे शक्य नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पूरग्रस्तांना प्राधान्य देण्याची मागणी आहे. मात्र राज्यात लाभार्थींची यादी मंजुरीविना पडली आहे. राज्याकडून यादी आल्यानंतर तत्काळ मंजुरीसाठी प्रयत्न केला जाईल. अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी केवळ स्क्रीनवर अ‍ॅक्टींग न करता समाजासाठी जगणारे म्हणून नाव मिळवले आहे. त्यांच्यानंतर दीपाली यांचे नाव घ्यावे लागेल,’’ असेही केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in