सरकारने विनंती केली पण मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार....

अडीच तास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
sambajiraje-mp-
sambajiraje-mp-

मुंबई : मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. मात्र या निर्णयांची अंमलबजावणी कशी होणार, यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. हे आंदोलन मागे घेतले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Sambhajiraje says will continue agitation for Maratha Reservaion)

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे आदी मंडळींसह सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. सरकार करत असलेल्य प्रयत्नांची माहिती अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना दिली. त्यानंतर संभाजीराजे यांनी स्वतंत्रपणे भूमिका मांडली. 

`सारथी' संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत व त्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 'सारथी' संस्थेची उपकेंद्रे सुरू करावीत. प्रत्येक जिल्हयात सारथी उपकेंद्र सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. मनुष्यबळ व पायाभूत सुविधा  उभारण्यासाठी 'सारथी' संस्थेला कमीतकमी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी. सारथी संस्थेचा कणा असणारा तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करावा. सर्वात महत्वाचे म्हणजे सारथी ची स्वायत्तता पुन्हा बहाल करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर येत्या शनिवारी बैठक पुण्यात होणार असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. या संस्थेसाठी मागेल तितका निधी देणार असल्याचे सरकारने मान्य केले आहे. यासाठी संस्थेच्या काय योजना आहेत, ते संस्थेच्या मंडळींनी शनिवारी सांगावे, असे ठरविण्यात आले आहे.

मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतीगृहांची उभारणी करण्याच्या मागणीवर 36 पैकी 23 जिल्ह्यात वसतिगृह सुरू होणार असल्याचे आश्वासन सरकारने दिले.

विशेष बाब म्हणून आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये Super Numerary Seats निर्माण करण्याच्या मागणीवर पुढील 15 दिवसांत सरकारचे धोरण ठरणार असल्याचे सांगण्यात आले. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवण्यता आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचे सरकातर्फे मांडण्यात आले.

मराठा समाजाच्या प्रश्नांविषयी मुख्यमंत्री नियमित आढावा घेणार असल्याचे सरकारने सांगितले. सकल मराठा समाजाने जाहीर केलेले मूक आंदोलन या आश्वासनानंतरी मागे घेण्यात आले नसल्याचे संभाजीराजे यांनी आवर्जून नमूद केले. कोल्हापूरमध्ये काल आंदोलन झाल्यानंतर दुसरा टप्पा 21 जून रोजी नाशिक येथे होणार आहे. तेथे सर्व समन्वयकांशी बोलून निर्णय घेण्यात येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in