संभाजीराजे, उदयनराजे अन् शिवेंद्रराजे येणार एकत्र

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यभरात समाजामध्ये नाराजी पसरली आहे.
संभाजीराजे, उदयनराजे अन् शिवेंद्रराजे येणार एकत्र
Sambhajiraje, Udayanraje and Shivendraraje may come together for Maratha Reservation

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यभरात समाजामध्ये नाराजी पसरली आहे. मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच आंदोलनाला सुरूवात केली आहे. आता राज्यभरात विविध माध्यमातून आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे तिघे एकत्र येण्याची शक्यता आहे. (Sambhajiraje, Udayanraje and Shivendraraje may come together for Maratha Reservation)

सोलापूरात येत्या 4 जुलैला मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्चासाठी तिघांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. खासदार नारायण राणेही या मोर्चाला उपस्थित राहू शकतात, असे पाटील यांनी सांगितले.

या मोर्चात सोलापूर शहर-जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने होतील. ता. 4 जुलै रोजी सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चाला सुरूवात होईल. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांसोबत चर्चा झाल्याचे पाटील म्हणाले.  पत्रकार परिषदेला सोलापूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार, श्रीकांत घाडगे, सोमनाथ राऊत, प्रताप कांचन आदी उपस्थित होते. 

ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, ही या मोर्चातील प्रमुख मागणी असणार आहे. तसेच कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला व सारथी संस्थेला एक हजार कोटी, सोलापुरात सारथीचे उपकेंद्र, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह,  छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती सुरू करणे, मराठा आरक्षणासाठी आत्मदहन केलेल्या मुलांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि कुटुंबाला 10 लाख रुपये मदत आदी मागण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.  

दरम्यान, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात केली.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह पुणे येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सारथी संस्थेचे अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in