पुण्यातील आरटीओ कार्यालये सोमवारपासून सुरू होणार

राज्य सरकारने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रादेशिक व परिवहन कार्यालयांचे कामकाज सोमवारपासून (ता. 18) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या कार्यालयांमध्ये वाहनांच्या नोंदणीचे काम उद्यापासून सुरू होणार आहे.
पुण्यातील आरटीओ कार्यालये सोमवारपासून सुरू होणार
RTO offices in Pune district will start from Monday

पुणे : राज्य सरकारने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रादेशिक व परिवहन कार्यालयांचे कामकाज सोमवारपासून (ता. 18) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या कार्यालयांमध्ये वाहनांच्या नोंदणीचे काम उद्यापासून सुरू होणार आहे. 

राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये 25 मार्चपासून बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांनी 17 मे रोजी आदेश काढून सोमवारपासून आरटीओ कार्यालय सुरू करण्याचे संबंधित कार्यालयांना कळविले आहे. त्यानुसार पुण्यातील आरटीओ कार्यालयाचे कामकाज सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. सोमवारपासून नव्या वाहनांच्या नोंदणीचे काम सुरू होणार आहे. त्यांना नवे नंबरही दिले जाणार आहेत. 

आरटीओ कार्यालयांमधील अन्य कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्याचा आराखडा लवकरच जाहीर करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. वाहन परवाना देणे, परवान्यांचे नूतनीकरण करणे, कर आकारणी करणे, वाहनांची मालकी हस्तांतर करणे, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना उपलब्ध करून देणे आदी कामांचा त्यांत समावेश आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील आरटीओचे कामकाज उद्यापासून सुरू होणार आहे. शासकीय कार्यालय सुरू करताना त्यात किती मनुष्यबळ ठेवायाचे, याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार त्यांचे पालन करण्यात येईल. "रेड झोन'मध्ये आरटीओचे कोणतेही कामकाज होणार नाही. मात्र त्या बाहेरील क्षेत्रात आरटीओची नेहमीप्रमाणे कामे सुरू होतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. 

पुणे, शहर आणि जिल्ह्यात मिळून एकूण सुमारे 65 लाख वाहने आहेत. राज्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या अनेक विभागांपैकी आरटीओ हा एक प्रमुख विभाग आहे. लॉकडाउनच्या काळात आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासासाठी आरटीओ कार्यालयाने संबंधितांना डिजिटल पास उपलब्ध करून दिले आहेत. 
 

21 कार्यालयांत दस्तनोंदणी 

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात असलेल्या भागात दुय्यम निबंधक कार्यालये, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये आणि विशेष विवाह कार्यालये पुरेशी खबरदारी घेऊन 18 मे पासून सुरु करण्यात येणार आहेत. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हवेली तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालये बंदच राहणार आहेत. 

ही कार्यालये कार्यान्वित करताना कामकाजादरम्यान कर्मचारी आणि नागरिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. सहजिल्हा निबंधक, पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली सर्व 21 कार्यालये दस्त नोंदणीसाठी 18 मे पासून (सद्यस्थितीत घोषित करण्यात आलेले प्रतिबंधित क्षेत्र व भविष्यात घोषित होणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये तो घोषित कालावधी वगळून) सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

सुरू होणारी दुय्यम निबंधक कार्यालये 

जिल्ह्यात बारामती तालुक्‍यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2, कार्यालय बारामती क्रमांक-1 सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय बारामती क्रमांक-2, शिरुर तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय शिरुर व तळेगाव ढमढेरे, दौंड तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय दौंड व केडगाव, भोर तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय भोर, वेल्हा तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय वेल्हा, इंदापूर तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय इंदापूर, जुन्नर तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय जुन्नर व नारायणगाव, आंबेगाव तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय आंबेगाव, पुरंदर तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय पुरदंर, मुळशी तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी 1 (पौड) व मुळशी 2 (हिंजवडी), मावळ तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे व लोणावळा, खेड तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय, खेड 1 (खेड), खेड 2 (चाकण), खेड 3 (खेड). 
 

Related Stories

No stories found.