जवानांना लागणारे उबदार कपडे देशातच बनवणे ही खरी आत्मनिर्भरता : रोहित पवार

चीन सीमेवर लढणाऱ्या जवानांना कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी लागणारे उबदार कपड्यांनी निर्मिती देशातच करुन आपण आत्मनिर्भर झाले पाहिजे, या लष्कराच्या उपप्रमुखांनी केलेल्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे
Rohit Pawar Supports Production of warm clothes for Jawans in Country
Rohit Pawar Supports Production of warm clothes for Jawans in Country

पुणे : चीन सीमेवर लढणाऱ्या जवानांना कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी लागणारे उबदार कपड्यांनी निर्मिती देशातच करुन आपण आत्मनिर्भर झाले पाहिजे, या लष्कराच्या उपप्रमुखांनी केलेल्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, देशातल्या उत्पादकांनी बनवलेल्या या तयार कपड्यांची खरेदी लालफितीत न अडकता तातडीने कशी होईल, याकडे तेवढंच लक्ष द्यावं लागेल, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

रोहित पवार यांनी फेसबूक पोस्टद्वारे लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात.... लडाखमध्ये चीन सीमेवर शत्रूशी लढताना आपल्या वीर जवानांना प्रतिकूल परिस्थितीमुळं निसर्गाशीही दोन हात करावे लागतायेत. तरीही आपले वीर न डगमगता भारतभूमीचं अहोरात्र संरक्षण करतायेत. या पार्श्वभूमीवर लष्कर उपप्रमुख ले. जनरल एस. के. सैनी यांनी जवानांसाठी आवश्यक असलेल्या उबदार कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्याची बातमी वाचनात आली. उणे ५० अंश सेल्सिअस एवढ्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत भक्कम पाय रोवून जवान उभे आहेत. त्यांना लागणारे उबदार कपडे आपल्याला आयात करावे लागतात. पण ही आयात आपण आणखी किती दिवस करत राहणार? जवानांना लागणाऱ्या वस्तू या आपणच बनवल्या पाहिजेत. आयात थांबवून आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे, हा सैनी यांनी व्यक्त केलेला विचार मला खूप आवडला. 

रोहित पवार पुढे म्हणतात....नाहीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिलाच आहे, तर त्याची सुरवात जवानांसाठी लागणाऱ्या साहित्यापासून करायला हरकत नाही. आणि फक्त आत्मनिर्भर होऊनच भागणार नाही तर या साहित्याचा दर्जाच एवढा उत्तम असेल की आपण त्याची निर्यातही करू शकू. विशेष म्हणजे आज सीमेवरील स्फोटक स्थिती लक्षात घेता याची गरज आणि संधीही आहे. त्यासाठी देशातील कंपन्या आणि युवांना चॅलेंज दिलं तर आपल्या देशातील टेक्सटाईल उद्योगातील अनेकजण योग्य डिझाईनचे दर्जेदार कपडे नक्की बनवून देतील, याबाबत काही शंका नाही.

देशात कोरोनाने हातपाय पसरले तेंव्हा मास्क आणि PPE किट आपल्याला आयात करावे लागत होते, किंबहुना अधिकचे पैसे मोजूनही ते पुरेसे उपलब्ध होत नव्हते, अशी सुरवातीची अवस्था होती, पण आज त्याच्या नेमकी उलट स्थिती आहे. उच्च दर्जाचे मास्क आणि PPE किट आपण फक्त तयारच करत नाही तर निर्यातही करत आहोत. हाच अनुभव जवानांना लागणाऱ्या साहित्याच्या बाबतीतही आल्याशिवाय राहणार नाही....असाही विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

तणाव निवळला तरीही चीनचा आजवरचा आपला अनुभव लक्षात घेता त्यावर लगेच विश्वास टाकणंही धाडसाचं ठरेल. त्यामुळं आत्मनिर्भर होण्याच्या लष्कर उप प्रमुखांच्या विधानाचं स्वागत करुन त्यांच्या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने जरूर पावलं उचलावीत आणि सरकार याचा निश्चित सकारात्मक विचार करेल, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in